पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन परिसरात रविवारी पहाटे एक अपघात झाला. नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक झाली आणि त्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या १७ वर्षीय मुलाने या दोघांना चिरडलंय. या घटनेवर मराठी अभिनेते व दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी पोस्ट केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील १७ वर्षीय आरोपीला रविवारी दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर केलं होतं. सुनावणीनंतर न्यायालयाने या आरोपीला काही अटींवर जामीन मंजूर केला होता. त्यात न्यायालयाने अल्पवयीन मुलाला घडलेल्या कार अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. तसेच आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबलबरोबर वाहतुकीचं नियोजन करावं, या दोन अटीवर त्याला जामीन मंजूर झाला. याचाच उल्लेख करत ‘तीन अडकून सीताराम’चे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी मार्मिक पोस्ट केली. “मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा… (पुणेप घात)” असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

hrishikesh joshi on pune accident
हृषिकेश जोशी यांची फेसबुक पोस्ट

हेही वाचा – पुणे : नोंदणीविनाच ‘पोर्शे’ रस्त्यावर, अपघातग्रस्त मोटारीबाबत आरटीओकडून धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील या घटनेबद्दल सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. आरोपी मुलाला अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लोक करत आहेत. दुसरीकडे मृत अश्विनी व अनिशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत अश्विनी वडिलांचा वाढदिवस असल्याने १८ जूनला ती जबलपूरला जाऊन सरप्राईज देणार होती. पण त्याआधीच हा भयंकर अपघात झाला आणि अश्विनीचं निधन झालं.

हेही वाचा – अश्विनी कोस्टा वडिलांना देणार होती वाढदिवसाचं सरप्राईज, मृतदेह पाहून आईने फोडला टाहो

आमदार रवींद्र धंगेकर यांचे आरोप

पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. “पुण्यातील अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला सोडून दिलं. याप्रकरणात जी कलमं दाखल व्हायला हवी होती, ती दाखल करण्यात आली नाही. खरं तर याप्रकरणात काल या आरोपीच्या वडिलांनाच अटक व्हायला हवी होती. मात्र, या उलट पोलिसांनी रेडकार्पेट टाकून आरोपीला घरी पाठवलं. खरं तर यात काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला,” असा दावा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे.