दिग्दर्शक केदार शिंदे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. सध्या त्यांनी दिग्दर्शित केलेला बाईपण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच केदार शिंदेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी निर्माते अजित भुरे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल सांगितले आहे. त्याबरोबर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबद्दलही भाष्य केले आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ने मोडला बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, कमाई पाहून केदार शिंदे म्हणाले, “तब्बल २१ वर्ष…”
केदार शिंदे यांची पोस्ट
“आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. आयएनटी.. १९९३. माझी “बॅाम्ब एक मेरी जान” एकांकिका तेव्हा अंतिम फेरीत होती. निकालाची वेळ आणि त्याला लागणारा वेळ! यात हळूहळू पोरं पोरी आरडाओरडा करू लागली.. एकच जयघोष.. भुरे काका पडदा उघडा, पडदा उघडा!!! भुरे काका, ही त्याची माझी पहिली ओळख. पण पुढे व्यावसायिक रंगभूमीवर काम सुरू केलं आणि भुरे काकाचा तो, अजितदादा झाला. सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे! अजित भुरे!!
ही प्रस्तावना लिहिली अशासाठी की, बाईपणभारीदेवा या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत या माणसाचा मोठा हात आहे. तो या सिनेमाचा सह निर्माता आहेच पण, या प्रवासात त्याची मला खुप साथ लाभली. गेली ४ वर्ष हा सिनेमा थांबला तेव्हा मला धीर देणारा अजितदादा होता. त्याआगोदर जेव्हा कुणीही निर्माता या सिनेमासाठी तयार होत नव्हता तेव्हा, केदार आपण हा सिनेमा करायचा.. असं म्हणणारा अजितदादा होता. सिनेमा कुणी एकटा करत नाही म्हणून त्याचं यशही एकट्याने घ्यायचं नसतं. ते कृतघ्नपणाचं लक्षण आहे. स्वामींचे आभार की, ते विविध रूपात माझ्या पाठीशी आहेत. आता उद्या आणखी एक महत्त्वाची व्यक्ती!! जीच्या मुळे ही कल्पना निर्माण झाली”, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : “प्रथमेश लघाटेने प्रपोज केल्यानंतर होकार देण्यासाठी तीन दिवस का घेतले?” मुग्धा म्हणाली, “कारण मला…”
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला पहिल्या शो पासून प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे.