केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ६० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. मात्र केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. नुकतंच त्यांनी याबद्दल भाष्य केले आहे.
शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा मराठी चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला. शाहीरांचे नातू केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात शाहीरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली होती. तर या चित्रपटात सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली होती. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ला अपेक्षित यश का मिळवता आलं नाही, याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला शरद पोंक्षेंचा रामराम, कारण आले समोर, म्हणाले “माझ्या जागी…”
“महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याचदरम्यान एक दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या. हा एक भाग आहे.
त्याबरोबरच हा चित्रपट तरुणांनी पाहावं, अशी अपेक्षा मला होती. ते काही फारसं घडलं नाही. तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला. हा चित्रपट ज्यांनी पाहिला, त्यांना तो आवडलाही. शाहीर साबळे यांच्या कार्याचे, कर्तृत्वाचे डॉक्युमेंटेशन होणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. हा चित्रपट म्हणजे एक पुस्तक आहे. आज ना उद्या कुणीतरी ते उघडून वाचणार”, असे केदार शिंदेंनी म्हटले.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”
दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाण्यावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.