मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असं आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांची लेखदेखील काम करत आहे. आता आणखीन एका भूमिकेबद्दल केदार शिंदे यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
केदार शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असतात. सध्या ते ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या संदर्भातील घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी या चित्रपटातील एक महत्वाच्या भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. या चित्रपटात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची भूमिका अभिनेते अतुल काळे साकारत आहेत.
Photos : सचिन पिळगावकरांची पत्नीबरोबर दुबई सफारी; जगप्रसिद्ध मिरॅकल गार्डनला दिली भेट
केदार शिंदे पोस्टमध्ये म्हणालेत “संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पार पडल्यावर महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन आले असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण… जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत ज्यांच्या समोर पहिल्यांदा सादर झालं असं धोरणी व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण… हे सार असूनही शाहीर साबळे आणि यशवंतराव चव्हाण ह्यांचं नातं राजकारणाच्या ही पलीकडचं होत.. हेच नातं उलगडणार २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीर ह्या सिनेमात. आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर. यशवंतरावांच्या भूमिकेत आहेत श्री. अतुल काळे.”
अभिनेते अतुल काळे अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ‘वास्तव’, ‘जिस देश मै गंगा रहता है’, ‘दे धक्का’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ‘बाळकडू’ या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. माझा होशील ना या मालिकेत त्यांनी काम केले आहे. अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. तर या चित्रपटाला संगीत अजय- अतुल यांचं असणार आहे.