‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यांसारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन विजू माने यांनी केलं आहे. कविता, वेबसीरिज आणि चित्रपटाच्या माध्यमातून ते कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. गेली अनेक वर्ष विजू मानेंच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरवर्षी विजू मानेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
विजू माने यांची पोस्ट
राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेली जवळपास २० वर्ष ( कोरोनातली दोन वर्षे वगळता) आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा शिरस्ता ह्या वर्षीही मोडला नाही. आभार मानून अपमान करणार नाही परंतु ह्या व्यक्तीच्या या वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. ते एक आमदार असताना, मग मंत्री झाल्यावर आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरचं सलग दुसरं वर्ष ते आमच्या घरी आले. मी, माननीय शरद पवार ह्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने सर्वसामान्य माणसाला भेटी गाठी दिल्याचे अनेक किस्से ऐकले आहेत. परंतु, सन्माननीय एकनाथजी शिंदे ही मला आलेली प्रचिती आहे.
राजकारण आपल्या जागी असेल परंतु माझ्या मते याला समाजकारण म्हणावं. थेट संपर्कातून, संवादातून समाजभान जपण्याचं द्योतक आहे हे. केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगतो आहे असं नाही. माझ्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरता शिरता आमच्या बिल्डिंग मधल्या एका व्यक्तीने त्यांना विनंती केली माझ्या घरी गणपतीला याल का? मला माहिती होतं, साहेबांची तब्येत बरी नाहीये. त्यांना थ्रोट इन्फेक्शन, शिवाय तापही आहे आणि तरीही त्यांनी त्या व्यक्तीची विनंती नाकारली नाही. मलाही त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.
कै. धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्वसामान्यांमध्ये असलेला करिष्मा त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामध्ये होता. यात सगळ्यात महत्त्वाचं स्थान गणेशोत्सवाला आहे. दिवस-रात्र गणेशोत्सव मंडळ आणि जी कोणी व्यक्ती आमंत्रित करेल त्या व्यक्तीच्या घरच्या श्री गणेशाचे दर्शन हा पायंडा त्यांनी पाडला होता. त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपली सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटणार नाही याची काळजी एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत हे खचितच भूषणावह आहे.
हेही वाचा : राघव-परिणीतीच्या लग्नात पाहुण्यांसाठी कडक नियमावली, पाळाव्या लागणार ‘या’ अटी
दरम्यान, विजू मानेंनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या ‘स्ट्रगलर साला सीझन तीन’चा सहावा एपिसोड अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला झाला. आतार्यंत या एपिसोडला ६ लाख ५३ हजारपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये विजू माने यांच्याबरोबर कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण पाहायला मिळत आहेत.