बॉलिवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटांमध्येदेखील सिक्वल येत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘बॉईज ३’ याचा आता पुढील भाग म्हणजे बॉईज ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉईजच्या निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे. ‘बॉईज ३’ला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले आहे. या निमित्ताने या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. तेव्हा चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली.
अमित ठाकरेंना महेश मांजरेकर ‘या’ चित्रपटातून करणार होते लाँच; राज ठाकरे म्हणाले, “बाप बेटे दोघे… “
बॉईज चित्रपटाचा पहिला भाग २०१७ साली प्रदर्शित झाला होता. बॉईज ३’ हा चित्रपट १६ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. प्रतीक लाड, पार्थ भालेराव आणि सुमंत शिंदे या त्रिकुटासह विदुला चौगुले या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ‘बॉईज ३’ या चित्रपटात धैर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाला किर्तीने दिलेली साथ प्रेक्षकांना भावली आहे. प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टी आणि समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. ‘बॉईज ३’ चित्रपटाची सोशल मीडियावरही तुफान चर्चा झाली होती. याच चित्रपटाचा चौथा भाग येत असल्याने साहजिकच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘बॉईज ३’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ३ कोटींची कमाई केली. राज्यात ठिकठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफूल झाले होते. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यशाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ”याचे श्रेय ‘बॉईज ३’च्या संपूर्ण टीमला जाते. कारण पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे धावपळ करणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. या यशात प्रेक्षकांचाही सहभाग मोठा आहे.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.