‘प्रेमाचा त्रिकोण’ भारतीय चित्रपटसृष्टीतील हा विषय म्हणजे हुकूमाचा एक्का, प्रेम म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो हक्क गाजवतो तसचं त्यानेदेखील आपल्यावर प्रेम करावं ही सर्वसामान्य अपेक्षा व्यक्ती ठेवत असतात. मात्र त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नसूनदेखील त्याच्यावर प्रेम करावं ते इतकं की त्या व्यक्तीच्या वाईट गोष्टींवर दुर्लक्ष करत, फक्त प्रेम करावं, हीच गोष्ट घेऊन आले आहेत महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश- जिनिलीया, ते देखील मराठी चित्रपटात, नुकताच त्यांचा बहुचर्चित ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटात काय?

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाची बांधणी सरळ नसून भूतकाळ आणि वर्तमान यांना बांधणारी आहे. सत्या (रितेश देशमुख) हा तरुण ज्याला फक्त दोन गोष्टींचे वेड असते ते म्हणजे क्रिकेट’ आणि त्याची प्रेयसीवर (जिया शंकरअसलेले) प्रेम. या दोघांच्या बाबतीत तो अगदी वेडा झालेला असतो. मात्र परिस्थिती अशी ओढवते की त्याला धड क्रिकेटमध्ये जम बसवता येत नाही आणि प्रेयसीदेखील मिळत नाही, या दुःखातून मार्ग शोधण्यासाठी तो व्यसनांकडे वळतो. अशातच मग पुढे येते ती श्रावणी (जिनिलीया देशमुख) सत्याला या परिस्थितीतदेखील त्यांच्याशी लग्न करते. आणि मग सुरू होतो त्यांचा प्रवास, सत्याचे वडील, श्रवणीचे आई वडील सत्याच्या अशा अवस्थेमुळे चिंतेत असतात. अशातच एक दिवस सत्याला प्रशिक्षकाच्या नोकरची संधी येते आणि तो दिल्लीला जातो आणि इथून पुढे कथानक वेगळ्या वळणावर जाते. सत्या आणि श्रावणी शेवटी एकत्र येतात का? त्यांचा एकमेकांच्या प्रेमासाठीच संघर्ष संपतो का? यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.

हा चित्रपट मूळ ‘मजिली’ या दाक्षिणात्य चित्रपटावर बेतला आहे. रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. त्यामूळे चित्रपटात काही त्रुटी जाणवतात, तसेच चित्रपटात त्याने अभिनयदेखील केला आहे. सत्या त्याने उत्तम वठवला आहे. क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग, स्थानिक राजकीय नेत्यांची अरेरावी अशा मुद्यांवरदेखील भाष्य केलं आहे. एरव्ही बायकोकडे ढुंकून न बघणारा सत्या बायकोची छेड काढली म्हणून गुंडाशी दोन हात करतो, सत्याच्या भूमिकेतील हे कंगोरे दिसून येतात. निषाच्या भूमिकेत असणारी जिया शंकर शोभून दिसते. जिनिलीयाने साकारलेली खंबीर तितकीच हळवी अशी श्रावणी उत्तम आहे. तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून तिने आपल्या परीने भूमिकेला न्याय दिला आहे. सत्याचा वडिलांच्या भूमिकेत अशोक मामा भाव खाऊन जातात. इतर कलाकारांचे अभिनय चोख आहेत . चित्रपटातील उत्तम बाजू म्हणजे छायाचित्रण आणि संगीत, जमून आल्या आहेत. अजय अतुल यांच्या संगीताने चित्रपट आणखीन उंची गाठतो. शेवटी ‘मला वेड लावलंय’ गाण्यात सलमान भाऊंच्या एंट्री झाली आहे.

आणखी वाचा – ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

सध्या ऐतिहासिक, बायोपिक, अशा धाटणीचे चित्रपटांची चर्चा सुरु असताना एक वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. जे लोक प्रेमात वेडे आहेत आणि जे लोक वेड्यासारखे प्रेम करतात अशांसाठी हा चित्रपट एक नक्कीच पर्वणी ठरेल.

वेड :

दिग्दर्शक : रितेश विलासराव देशमुख
निर्माती : जिनिलीया देशमुख
गीतकार : गुरु ठाकूर, अजय अतुल
पटकथा : ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख
संवाद : प्राजक्त देशमुख
छायचित्रण : भूषणकुमार जैन