चित्रपटाच्या विषयानुरूप समर्पक शीर्षक असलेला ‘अल्याड पल्याड’ हा भूतपट त्यातील कथेमागचं मूळ समजून घेऊनच पाहायला हवा. कोकणातल्या गावपळण या प्रथेला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. गावपळण म्हणजे काय? याची थोडी कल्पना असली तरी भूत किंवा आत्मा या घटकांचा कथेतला सहभाग निश्चित होतो. त्यामुळे चित्रपट सुरू झाल्या झाल्या प्रेक्षकांची भूत दिसणार अशी मानसिक तयारी करून घेतली जाते. मग फक्त भूत किंवा आत्मा कशामुळे? काय? कसं? आदी प्रश्नांच्या उत्तरांची रंजक पेरणी करत दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी ‘अल्याड पल्याड’चा खेळ रंगवला आहे.

कोकणात मालवणमधील काही गावांमध्ये गावपळण ही प्रथा पाळली जाते. दर तीन-चार वर्षांनी देवाचा कौल घेऊन सगळे गावकरी आपापले खाण्या-पिण्याचे सामान, कपडे, घरातली पाळलेली जनावरं अगदी कोंबड्या, कुत्रे सगळं घेऊन तीन दिवस गावच्या वेशीबाहेर जातात. तीन दिवस एकत्र बाहेर राहणं, एकत्रित जेवण, मनोरंजन असा सगळा माहौल अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा देवाचा कौल घेऊन मंडळी गावात परततात. या तीन दिवसांत गावात कोणीही थांबत नाहीत. या प्रथेमागे अर्थातच भुतांचे वास्तव्य आणि देवाने त्यांचा बंदोबस्त केल्याची कथा आहे. तर या गावपळण संकल्पनेच्या अनुषंगानेच ‘अल्याड पल्याड’ची कथा घडते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच गावचे सरपंच आणि मुख्य पुजारी सगळ्या गावकऱ्यांना सामान आवरून अमुक एका मुहूर्तावर गावाबाहेर जायचं असल्याची कल्पना देताना दिसतात. अर्थात, ही प्रथा कैक वर्ष पिढ्यानपिढ्या पाळली जात असली तरी खरोखरच भूत-आत्मा या संकल्पना खऱ्या आहेत का? त्या तीन दिवसांत गावात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू ओढवतो का? अशा शंका-कुशंका काहींच्या मनात येतच असतात. तर अशाच पद्धतीने भूत वगैरे काही नसतं असं मानणारी चार तरुण मंडळी संपूर्ण गाव वेशीबाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा गावात परततात. गावात परतल्यानंतर एका रात्रीत त्यांच्याबरोबर घडणारा भयभुताचा खेळ ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटातून पाहायला मिळतो.

Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
career animal love
चौकट मोडताना : प्राणिप्रेमाची धास्ती
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका

हेही वाचा >>> श्रिया पिळगांवकरच्या आजोबांना पाहिलंत का? ८५ वा वाढदिवस ‘असा’ केला साजरा, फिरले आहेत १०० देश

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच यात भूतप्रेतादि गोष्टी असल्याचं सतत मोठमोठ्या भीतीदायक आवाजांमधून भासवलं जातं. अगदी पहिल्या काही दृश्यांत तंत्रमंत्र करणाऱ्या वृद्धाचा खेळही कुठल्या तरी विचित्र अदृश्य शक्तीकडून संपवला जातो असं दिसतं. सुरुवातीलाच या गोष्टी स्पष्ट झाल्याने त्यातलं रहस्यच संपून गेलं आहे. भूत आहे की कोणी आपल्याला फसवतं आहे? ही शंकाच लेखक – दिग्दर्शकाने पहिल्या काही प्रसंगातून काढून टाकली आहे. त्यामुळे मग फक्त हे भूत दिसतं कसं? किती घाबरवतं आणि त्यामागची कथा इतकीच उत्सुकता पाहणाऱ्याच्या मनात असते. इथेही प्रेक्षकांना घाबरवायचं की हसवायचं? हा सध्याच्या विनोदी भयपटांच्या बाबतीत होणारा गोंधळ पाहायला मिळतो. त्यामुळे चित्रपटाचा पूर्वार्ध हा भुतावरून केले जाणारे विनोद, एकमेकांना डिवचण्यासाठी केल्या जाणाऱ्या गमतीजमती यात खर्ची पडला आहे. तर उत्तरार्धात खऱ्या अर्थाने चित्रपटातील भुतांची गोष्ट रंगू लागते.

‘अल्याड पल्याड’ची मांडणी करताना भयपट किंवा रहस्यपटांसाठी आवाजाच्या जोरावर उभा केला जाणारा खेळ इथेही पाहायला मिळतो. किंबहुना आवाजाचा वापर अंमळ अधिक झाला आहे. त्या तुलनेत भीती वाटावी अशी मांडणीच केलेली नाही. मनोरंजनासाठी का होईना चित्रपटाची हलकीफुलकी मांडणी करण्यात आली आहे. ही काहीशी विनोदी मांडणी आणि त्यासाठी मकरंद देशपांडे, संदीप पाठक, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी असे विनोदातील हुकमी एक्के असलेल्या कलाकारांची केलेली निवड यामुळे हा चित्रपट मनोरंजनात कुठेही कमी पडत नाही. मकरंद देशपांडे यांनी यात सिद्धयोग्याची भूमिका केली आहे. त्यांचा चित्रपटातला प्रवेश हा जवळपास उत्तरार्धाच्या सुरुवातीला होतो. त्यांची व्यक्तिरेखा काहीशी गंभीर असली तरी त्यांचा वावर आणि कथेला दिलेलं वळण गमतीशीर असल्याने शेवटचा जारणमारणाचा खेळही रंजक झाला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपट उत्तरार्धात वेग घेतो. संदीप पाठक यांनी त्यांच्या नेहमीच्या सहजशैलीत रंगवलेला दिल्या आणि त्याच्या जोडीला गौरव-सक्षम-भाग्यम जैन या त्रिकुटाच्या मदतीने रंगवलेले प्रासंगिक विनोद यामुळे चित्रपट रंजकतेच्या बाबतीत खरा उतरला आहे. बाकी यातली भुताची कल्पना आणखी संवेदनशीलतेने हाताळली असती तर त्याचा प्रभाव पडला असता. शिवाय, कोकणातील प्रथेचा आधार घेत रचलेली ही कथा नक्की कोणत्या प्रांतात घडते याची कल्पना दिलेली नाही, मात्र झाडून सगळी पात्रं पश्चिम महाराष्ट्रातील लहेजात संवाद बोलताना दिसतात. भयपटासाठी केलेला सारा खटाटोप विनोदातच खर्ची पडला आहे. त्यामुळे रंजकतेच्या ‘अल्याड पल्याड’ न जाता केलेला विनोदी भयपट म्हणूनच याकडे पाहायला हवं.

अल्याड पल्याड

दिग्दर्शक – प्रीतम एसके पाटील

कलाकार – मकरंद देशपांडे, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन, चिन्मय उदगिरकर, अनुष्का पिंपुटकर.

Story img Loader