आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी कलाकारांची मांदियाळी असलेल्या एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असेल. ‘होय महाराजा’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट असेल.
एलएमएस फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी ‘होय महाराजा’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब ‘होय महाराजा’ म्हणत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेशनं आजवर साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे, त्यामुळे या चित्रपटात प्रथमेश कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत कुतूहल आहे. क्राईम-कॅामेडी प्रकारात मोडणारा हा चित्रपट एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेला आहे. एक सर्वसामान्य तरुण आपल्या प्रेमाखातर कशा प्रकारे लढा देतो याची रोमांचक कहाणी ‘होय महाराजा’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेशसोबत अंकिता ए. लांडे ही अभिनेत्री दिसणार आहे. याचबरोबर अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौगुले असे एकापेक्षा एक अफलातून विनोदवीर या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘होय महाराजा’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संचित बेद्रे यांनी केलं आहे. गुरु ठाकूरने लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या संगीतकार जोडीचं संगीत लाभलं आहे. डिओपी वासुदेव राणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निलेश नवनाथ गावंड यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत अमेया नरे, साजन पटेल यांनी दिलं असून, नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकरने केलं आहे. फाईट मास्टर मोझेस फेर्नांडीस यांची अॅक्शन चित्रपटात पाहायला मिळणार असून, कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे. जान्हवी सावंत सुर्वे यांनी वेशभूषा केली आहे.