रेश्मा राईकवार
भयाचं भूत मानगुटीवर बसलं की भल्याभल्या व्यक्ती विवेक हरवून बसतात. कित्येकांचे विचार डळमळतात आणि मग हातून अनाकलनीय, चमत्कारिक कृत्ये केली जातात. रूढी – परंपरांची नवीच भूतं मनासमोर नाचू लागतात. हसती खेळती घरं एका क्षणात उद्ध्वस्त होतात, असे कित्येक दाखले आपण आजूबाजूला पाहतो. श्रध्दा असावी, पण ती आंधळी असू नये हे अधोरेखित करत सतत कुठल्या तरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा, हे सांगण्याचा प्रयत्न ‘पंचक’ या चित्रपटात करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> Ole Aale Movie Review : खुसखुशीत भावपट
‘पंचक’ चित्रपटाची कथा कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील पाच माणसं एकापाठोपाठ एक देवाघरी जातात, असा समज आहे. त्यालाच पंचक लागलं असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील अनंतराव हे कोणत्याही धार्मिक प्रथा-रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या अनंतरावांचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतं. अनंतरावांचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखाच अंधश्रध्दा न मानणारा, संशोधक आहे. त्याचा चुलतभाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघंही सोडले तर माधवचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलत भाऊ विजय, त्याची पत्नी वीणा, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आत्या ही सगळीच मंडळी रूढी-परंपरा कसोशीने पाळणारी. देवाधर्माच्या गोष्टी केल्या नाहीत तर मूळ पुरुषाचा, कुळ पुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा देहदान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भंबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागतं की या न पाहिलेल्या पंचकाचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसतं? अनंतरावांनंतर आता कोणाचा नंबर? ही भीती खोतांच्या घरात काय खेळ घडवून आणते? याची विनोदी, खुसखुशीत शैलीत मांडणी लेखक – दिग्दर्शकद्वयी राहुल आवटे आणि जयंत जठार यांनी केली आहे.
हेही वाचा >>> Satyashodhak Movie Review : महात्म्याच्या आयुष्याचा वास्तवदर्शी वेध!
कोकणात चित्रित झालेल्या ‘पंचक’ या चित्रपटात मालवणी भाषेचा केलेला वापर आणि दिग्गज कलाकारांनी केलेला अभिनय यामुळे खऱ्या अर्थाने गंमत आली आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी विनोदी धाटणीचीच आहे. पण चित्रपट विनोदी करण्याच्या नादात श्रध्दा की अंधश्रध्दा? भीतीचं हे भूत कसं घालवायचं? आदी प्रश्नांवर सविस्तर भाष्य करणं टाळलं आहे. पटकथेतच या विषयाची सखोल मांडणी झालेली नाही. किंबहुना विनोद घडवण्यासाठी म्हणून असेल पण अतार्किक प्रसंगांवर अधिक भर आहे. कावेरीच्या मनातली भीती अनाठायी आहे हे दाखवण्यासाठीचे माधवचे प्रयत्न फार तोकडे आहेत. स्वत: डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर माधव जे उपाय करतो तेही व्यवहार्य नाहीत असे चित्रपटातील प्रसंगातून सूचित होते, पण ते होऊनही ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड या धर्तीवर सगळं कुटुंब पुन्हा एकत्र येतं ही सहजसुलभ मांडणी पचनी न पडणारी आहे. वर म्हटल्याप्रमाणे चित्रपटाचा बाज विनोदीच असेल हे लक्षात घेऊन त्याची मांडणी केली असल्याने माधव आणि रेवती वगळता हा गंभीर विषय फारसा कोणापर्यंत पोहोचतो आहे असे दिसत नाही. दिलीप प्रभावळकरांचा अनंतराव अजून थोडा अधिक पाहायला मिळावा असं वाटत राहतं. मात्र त्याऐवजी त्यांच्या आवाजातील संवाद कानावर पडत राहतात. भारती आचरेकर आणि सतीश आळेकर या दोघांनीही त्यांच्या वाटयाला आलेल्या भूमिका सहजसुंदर निभावल्या आहेत. बाकी मधल्या फळीतील पात्रांची संख्याच अधिक. नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, आनंद इंगळे, आशुतोष, दीप्ती देवी, संपदा वागळे, आरती वडगबाळकर, विद्याधर जोशी, गणेश मयेकर, तेजश्री प्रधान हे सगळेच कलाकार उत्तम आहेत. त्यांनी आपल्या वाटयाला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. त्यातल्या त्यात माधवच्या भूमिकेतील आदिनाथ कोठारेला इतरांच्या तुलनेत अधिक वाव मिळाला आहे. इतक्या चांगल्या कलाकारांचा अभिनय, कोकणातलं चित्रण आणि विनोदी मांडणी यामुळे ‘पंचक’ चित्रपट चांगला वाटतो, पण तो या सगळयांच्या जोरावर अधिक चांगला करता आला असता हा विचारही मनात डोकावल्याशिवाय राहात नाही.
पंचक
दिग्दर्शक – जयंत जठार, राहुल आवटे, कलाकार- आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, आनंद इंगळे, आशुतोष, दीप्ती देवी, संपदा वागळे, आरती वडगबाळकर, विद्याधर जोशी, गणेश मयेकर, तेजश्री प्रधान