अनंत जोग यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. चित्रपट, मालिकांमधला खलनायक अशी ओळखच जणू आता त्यांची झाली आहे. अनंत जोग यांनी नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना पहिला हिंदी चित्रपट कसा मिळाला आणि त्यादरम्यान झालेला एक मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला आहे. हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार स्वभावाने त्यांनी अनेकांना ‘जशास तसे’चं महत्व पटवून दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ला दिलेल्या मुलाखतीत अनंत जोग म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी माझी ‘कुछ खोया, कुछ पाया’ ही मालिका पाहिली होती आणि नंतर ते मला राज ठाकरेंच्या लग्नात भेटले. तेव्हा ते मला म्हणाले की, मला वाटतं तुम्ही हिंदी सिनेमात काम केलं पाहिजे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, बाळासाहेब एक तर माझी तिथे कोणाबरोबर ओळख नाही. तर तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या बंगल्यावर भेटायला बोलावलं. मी त्यांना भेटलो आणि तेव्हा बाळासाहेबांनी माझं नाव प्रकाश मेहरा यांना सुचवलं आणि मला हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.”

हेही वाचा… VIDEO: नताशा दलालच्या बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष; मतदान केंद्रावर एकटीला पाहून नेटकरी म्हणाले, “अशा अवस्थेत वरुण…”

अनंत जोग पुढे म्हणाले, “तर त्या चित्रपटात प्रकाश मेहरा यांनी मला एक भूमिका दिली आणि त्याचं फिल्मसिटीत शूटिंग सुरू होतं, तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते. तिकडे सगळे दिग्गज बसले होते. अनुपम खेर, शक्ती कपूर अमूक तमूक. मी एका खुर्चीवर बसलो होतो. मी त्यांना ओळखत होतो, पण ते मला ओळखत नव्हते आणि ती अपेक्षाही नव्हती. मी खुर्चीवर बसलो होतो तेव्हा मी एकाला विचारलं की, आपण का थांबलोय? शूटिंग का सुरू होत नाहीय? यावर तो म्हणाला, अजून अनिलजी आले नाही आहेत. अनिलजी म्हणजे अनिल कपूर. मग थोड्यावेळाने ते आले. तेवढ्यात माझ्याकडे एक स्पॉटबॉय आला आणि तो मला म्हणाला, उठो उठो खुर्सी दो, खुर्सी दो. मी म्हटलं एवढं काय झालं. तर तो मला म्हणाला की, अनिल कपूर आलेत तर त्यांना पायात शूज घालायचेत, तर ते बसून घालणार ना. असं म्हणून तो माझी खुर्ची घेऊन गेला.”

“बराच वेळ झाला मला काही कोणी खुर्ची आणून दिली नाही. मी एक दोघांना म्हणालो की, खुर्ची असेल तर द्या; तर कोणीच द्यायला तयार नव्हतं. मग म्हटलं काय करणार, माझे पाय दुखायला लागले होते. तिकडे एकतर कोणी माझ्या ओळखीचं नव्हतं सांगायला की मला खुर्ची द्या वगैरे. मग तिकडे मी एक बेंच बघितला. बागेत सिमेंटचा बाक असतो तसा तो बेंच होता. तो थोडा चिखलाने खराब झाला होता. मी त्याच्यावर जाऊन बसलो. थोड्यावेळाने मी तिथे झोपलो. माझे कपडे पूर्ण पांढरे शुभ्र होते”, असं अनंत जोग म्हणाले.

हेही वाचा… ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरने शेअर केला खास व्हिडीओ; अभिनेता म्हणाला, “दोस्तो क्या…”

अनंत जोग पुढे म्हणाले, “काही वेळाने प्रकाश मेहरा आले, त्यांनी शॉट लावला. तो क्रेन शॉट होता. अनिल कपूरच्या आईची चिता जळत होती असा काहीतरी सीन तेव्हा सुरू होता. अमरिश पुरी, आम्ही सगळी डाकू मंडळी तिथे आलोय, असा आमचा शॉट होणार होता; तर ते क्रेन जेव्हा खाली आलं तेव्हा प्रकाश मेहरा यांनी बघितलं की माझे कपडे मागून सगळे खराब झालेत. मग त्यांनी मला विचारलं काय झालं? तुम्ही कुठे पडलात का? तर मी म्हटलं नाही. मग त्यांनी विचारलं, तुमच्या कपड्यांना मागे काय लागलंय? मग मी म्हणालो, अरे हो, चिखल लागलाय मागे. मग ते म्हणाले, जा हे कपडे कोणालातरी धुवायला सांग. मग मी म्हणालो, नाही मी असे धुतलेले कपडे नाही घालणार, त्यामुळे न्यूमोनिया होतो आणि तेव्हा वीन कॉस्ट्यूम नव्हता.”

हेही वाचा… “आडनाव जोग आणि काटा काढता येत नाही”, बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ किस्सा सांगत अनंत जोग म्हणाले…

“मग ते म्हणाले की, तू असा बसलासच कसा? तुला कळलं नाही? मी त्यांना म्हटलं, अहो मी बराचवेळ उभा होतो. एक स्पॉटबॉय माझी खुर्ची घेऊन गेला होता, पण त्याने काही माझी खुर्ची परत दिलीच नाही. बरं मी कितीवेळ उभा राहू, मी काय घोडा आहे का? तर ते म्हणाले, पॅकअप. मला वाटलं ते मला एकट्याला म्हणतायत, पण ते म्हणाले टोटल पॅकअप. कारण मी त्या शॉटमध्ये असणं आवश्यक होतं. दुसऱ्या दिवसापासून एक माणूस सतत खुर्ची घेऊन माझ्याजवळ असायचा”, असा मजेशीर किस्सा अनंत जोग यांनी सांगितला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi senior actor anant jog got bad treatment while shooting his first bollywood movie dvr