मराठी सिनेसृष्टीत आपल्या परखड विचारांमुळे चर्चेत असणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रांत आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे. या व्यतिरिक्त ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व याविषयी व्याख्यानंदेखील देत असतात. लवकरच त्यांचं ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या’ भेटीस येणार आहे. या नाटकाचे फक्त ५० प्रयोग होणार आहेत. यादरम्यान, शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकताच महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, “जगातली सर्वांत लांब नदी ‘नाईल नदी’ युगांडा ते इजिप्त ६८४० किमी एवढी वाहते. त्याचा हा उगम. तिथेच म. गांधींच्या अस्थी विसर्जित केल्या आहेत. ते पाहण्याचा योग आला.”
शरद पोंक्षेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “नदीला संपवायच्या भानगडीत पडू नका”, “मनातील नथुराम गोडसे जागे झाले असतील”, “साहेब अगदी खरं सांगा, तिथे गेल्यावर तुमच्या मनात काय विचार आला? आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल”, “महात्मा गांधी असं नाव लिहायला लाज वाटते का? गोडसेचे दत्तक पुत्र” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी शरद पोंक्षेंनी शेअर केलेल्या व्हिडीओवर दिल्या आहेत.
हेही वाचा – Video: शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, शरद पोंक्षे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ते ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या दररोज भेटीस येत आहेत. तसेच ते लवकरच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात ते डॉ. हेडगेवार यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.