महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक आदर्श शिंदे सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे कुटुंबाने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे कुटुंबाने पंढरपूर येथील वेळापूरमध्ये स्वतःचा पेट्रोलपंप सुरु केला. आदर्श आनंद शिंदे अस या पेट्रोलपंपाला नाव देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत उत्कर्ष शिंदेने ही आनंदाची बातमी दिली होती. आता आदर्शने या नव्या पेट्रोलपंपासंबंधी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आदर्शने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा नवा प्रेट्रोलपंप बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत आदर्शने लिहिलं “भिमाची पुण्याई… “Adarsh Anand Shinde Petroleum”. माझ्या “मम्मीचं” स्वप्नं होतं, ते पूर्ण केलं. आपला पेट्रोल पंप असायला पाहिजे असं तिला खूप वर्ष वाटत होतं आज ते सत्यात घडलं याचा आनंद आहे. एका नवीन विश्वात entry केली आहे, बघुया पुढचा प्रवास कसा होईल!”
आदर्शने पुढे लिहिलं “माझा मोठा भाऊ हर्षद शिंदे याने आधार दिला नसता तर हे शक्य झालं नसतं, कारण या उद्योगाला लागणारा वेळ, मनुष्य बळ आणि विश्वास माझ्या भावाकडे नसता तर हे शक्य झालं नसतं. आमच्या गावी “मंगळवेढे” इथे अनेक उद्योग करत असताना भाऊ म्हणाला “तू कर मी आहे”. या एका त्याच्या वाक्यामुळे जे बळ मिळालं ते शब्दात मांडता येणार नाही. तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं करु शकलो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार” आदर्शचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांबरोबर अनेक कलाकारांनीही कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा- Video शनिशिंगणापूर मंदिराला घुमट किंवा कळस का नाही? अवधूत गुप्तेने केला खुलासा, म्हणाला…
आदर्शच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर शिंदे घराणं हे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील नावजलेलं घराणं आहे. आदर्शला आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे आणि काका मिलिंद शिंदे यांच्याकडून गायनाचा वारसा मिळाला आहे. आपल्या रांगड्या आवाजाने आदर्शने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. मराठीबरोबर हिंदीमध्येही आदर्शने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.