आदर्श शिंदे महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक आहे. आपल्या रांगड्या आवाजाच्या जोरावर आदर्शने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आदर्शला आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे आणि काका मिलिंद शिंदे यांच्याकडून गायनाचा वारसा मिळाला आहे. आपल्या रांगड्या आवाजाने आदर्शने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. मराठीबरोबरच हिंदीमध्येही आदर्शने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सोशल मीडियावर आदर्श नेहमी सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. आता आदर्श एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.
आदर्शने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका ज्यूस सेंटरजवळ उभा आहे. या ज्यूस सेंटरचे आदर्श लेमन ज्यूस असे नाव आहे या फोटोवरून आदर्शने नवीन व्यवसाय तर सुरू केला नाही ना अशी चर्चा सुरू आहे. मात्र, आदर्शने पोस्टमध्ये फोटोबाबत खुलासा केला आहे. त्याने लिहिले, “नवीन बिझनेस सुरू केला आहे असं समजू नका, हा खूप जुना फोटो आहे. महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्या नावाचा हा ज्यूस सेंटर दिसला. मग काय, ज्यूस तर घ्यायलाच हवा. त्यामुळे ज्यूसपण घेतला आणि फोटोपण काढला.”
आदर्शने पुढे लिहिले “त्यावेळी आठवण म्हणून हा फोटो काढला होता. आता काही जुने फोटो पाहत असताना हा फोटो दिसला आणि एकटाच हसलो, तर म्हटलं ही गोड आठवण सर्वांबरोबर शेअर करूया. म्हणून माझा हा जुना फोटो तुमच्यासह शेअर करत आहे. सर्व आदर्श ज्यूस सेंटरला माझा जाहीर पाठिंबा.”
आदर्शची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांबरोबर काही कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरने कमेंट करत लिहिले आहे, “चला बरं झालं आता करिअरचे टेन्शन नाही,” तर दुसऱ्याने, “मला वाटलं तुम्ही पहिल्यांदा गायक होण्याच्या आधी लिंबू सरबत विकायचे का?” असा गमतीशीर प्रश्न विचारला आहे.
हेही वाचा- Video: साखरपुड्यात प्रथमेश परबचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे कुटुंबाने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. नोव्हेंबरमध्ये शिंदे कुटुंबाने पंढरपूर येथील वेळापूरमध्ये स्वतःचा पेट्रोल पंप सुरू केला. आदर्श आनंद शिंदे असे या पेट्रोल पंपाला नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत उत्कर्ष शिंदेने ही आनंदाची बातमी दिली होती.