मणिपूरमधील कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. याच संघर्षादरम्यान जमावाने दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली आणि शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी घडली मात्र, उघड व्हायला तब्बल ७७ दिवस लागले. मणिपूरमधील हिंसाचाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर याबाबत मराठी कलाविश्वातून अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : “आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही…”, मणिपूर घटनेवर संतापली अभिज्ञा भावे; म्हणाली…
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर संताप व्यक्त करत ट्वीट केले आहे. सलील कुलकर्णींनी ट्वीटमध्ये लिहिले, “फक्त जागा बदलतात आणि नावं…कधी निर्भया, कधी मुंबई आणि आता मणिपूर…वृत्ती बदलायला हवी नाहीतर ठेचायलाच हवी…कायमची!” नेटकऱ्यांनी सलील कुलकर्णींच्या या ट्वीटवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तसेच अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने सुद्धा या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “गलिच्छ!!! या नराधमांना जनावर म्हणणं सुद्धा जनावरांचा अपमान आहे…” असे ट्वीट करत अभिनेत्याने या घटनेचा निषेध केला आहे.
हेही वाचा : “सुन्न व्हायला होतं!” मणिपूर घटनेवर हेमांगी कवीची पोस्ट; म्हणाली, “सोशल मीडियावर बोलून उपयोग नाही, पण…”
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक केली आहे. तसेच जे दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाईल, या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी म्हटले आहे.