गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक उत्तमोत्तम गाणी गायली. तर सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात तिने गायलेल्या गाण्यांसाठी तिचं खूप कौतुक होत आहे. सावनीला ‘बार्डो’ या चित्रपटातील गाण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यादरम्यान तिने डिप्रेशनचा सामना केला असल्याचं तिने आता सांगितलं आहे.
‘बार्डो’ या चित्रपटासाठी जेव्हा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तेव्हा नुकतीच तिची डिलिव्हरी झाली होती. त्यावेळी तिची लेक अवघ्या दोन महिन्यांची होती. काळात तिने पोस्टपार्टम म्हणजेच डिलिव्हरीनंतर येणाऱ्या डिप्रेशनचा सामना केला होता. त्यामुळे तो राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला जाताना तिची द्विधा मनस्थिती झाली होती असं तिने नुकतंच ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
आणखी वाचा : Video: ‘बाईपण भारी देवा’ने एका आठवड्यात कमावले १२.५० कोटी, टीमने केलं खास सेलिब्रेशन
ती म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला गेले तेव्हा माझी मुलगी २ महिन्यांची होती. ती पूर्णपणे फिडींगवर होती. एकीकडे राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्याचा आनंद होता, पण दुसरीकडे पाच तास मी ऑडिटोरियममध्ये असणार आहे आणि पाच तास माझं बाळ उपाशी राहाणार आहे याचं टेंशन होतं. तिला माझ्यापासून दूर ठेवून, उपाशी ठेवून मी पुरस्कार घ्यायला कुठे जाऊ? असं मला वाटत होतं. मी तिची सगळी सोय करून ठेवली होती. आई-बाबांना तिला फॉर्म्युला द्या असं सांगितलं होतं.”
पुढे ती म्हणाली, “तेव्हा मलाही कळत नव्हतं मला काय होतंय. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे. पण त्या डिप्रेशनमुळे मला त्याचा आनंद घेता येत नव्हता. माझ्या शरिरात हार्मोनल इम्बॅलन्स होत असल्यामुळे तेव्हा मला काही कळत नव्हतं. मी ५ तास तिच्याशिवाय कशी राहू या चिंतेत मी होते. तेव्हा मला कळलं की आपलं बाळ आपल्याला काम करण्याची ताकद देत असतं. त्या दिवशी माझी मुलगी ५ तास उपाशी राहिली. आई बाबांनी फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही खाल्लं नाही.”
हेही वाचा : अशोक मामांनी पत्नी निवेदिता सराफ यांना लग्नानंतर दिली होती ‘ही’ महागडी भेटवस्तू, खुलासा करत म्हणाल्या…
पुढे तिने सांगितलं, “मी पुरस्कार घेतल्यावर तिथल्या काही लोकांनी मला पुढच्या मुलाखतीसाठी दुसरीकडे नेलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, प्लिज मला हॉटेलला जाऊ द्या. माझं बाळ उपाशी आहे. तेव्हा आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे माझं २ महिन्यांचं बाळ आणि दुसरीकडे नॅशनल टेलिव्हिजनवर माझी मुलाखत होणार होती. तेव्हा नवऱ्याने मला धीर दिला. मी कशीबशी ती मुलाखत दिली. या सगळ्यात ५ तासांहून अधिक वेळ झाला होता. पण त्या मुलीने तोंडातून आवाजही काढला नाही, ती अजिबात रडली नाही. मी हॉटेलवर गेल्यावर मुलीला घट्ट मिठी मारली. या सगळ्यात माझ्या बाळाने मला खरंच खूप ताकद दिली.”