‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग सर्वत्र हिट झाले आहेत. या चित्रपटाच्या शेवटी ‘मंगळागौर’ हे गाणं आहे. हे गाणं प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र हिने गायलं आहे. नुकतंच तिने आई होणं किती अवघड असतं? याबद्दल भाष्य केले आहे.
गायिका सावनी रविंद्रने नुकतंच एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला आई झाल्यानंतर आयुष्यात काय फरक पडला, याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तिने तिच्या आव्हानासह विविध गोष्टींबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “गरोदरपणाचा शेवटचा आठवडा, मोबाईलवरील रेकॉर्डिंग अन्…” प्रसिद्ध गायिकेने सांगितला ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्याचा किस्सा
“आपलं आयुष्य आता बदलणार आहे. आपलं आयुष्य आता आपलं राहणार नाही, अशी धाकधूक गर्भवती असताना कायम मनात असते. मला जेव्हा शार्वी नव्हती किंवा मूल नव्हतं तेव्हा मी माझीच होते. मी आशिषचीही नव्हते. पण जेव्हा तुम्ही आई होता, तेव्हा सगळंच जातं. तुम्ही त्या जीवाचे होऊन जाता. तुमच्यामध्ये हे तुमचं आहे, हे राहतंच नाही. हे माझंय इतकंच राहतं. आई होणं हे फार आव्हानात्मक आहे, असं मी ऐकलं होतं. मुलाला ब्रेस्ट फिडींग करायचं असतं, ते आपल्याला जमेल का? का बॉटलमधून दूध द्यावं लागेल, असे असंख्य विचार त्यावेळी येतात.
त्यावेळी हार्मोन्स बदलत असतात. प्रत्येक स्त्री यातून जात असते आणि ती याचा कधीच बाऊ करत नाही, हेच मला विशेष वाटते. जेव्हा ते बाळ जन्माला येतं, तेव्हा त्या आईकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. बाळ जन्माला येण्यापूर्वी त्या स्त्रीकडे सर्वजण बघत असतात. तिचे डोहाळे पुरवले जातात. तू बरी आहेस ना, तुला काय वाटतंय का अशी सतत चौकशी केली जाते. एकदा ते बाळ येतं, मग ती आई सेकंडरी होते. त्या बाळाला सांभाळत तिलाही पूर्वस्थितीत यायचं असतं. यात कुटुंबाचा आधार मिळणं फार महत्त्वाचं असतं”, असे सावनी रविंद्रने म्हटले.
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत ६० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.