सध्या रंगभूमीवर प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ नाटक चांगलंच गाजत आहे. या नाटकात अभिनेत्री मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे या चौघींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाला नुकतंच वर्ष पूर्ण झालं असून २२२वा प्रयोग देखील पार पडला. या प्रयोगाला ‘ताली’ वेब सीरिजच्या टीमनं हजेरी लावली होती. ‘चारचौघी’ हे नाटक पाहिल्यानंतर लेखक क्षितिज पटवर्धनने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच या नाटकातील कलाकारांचं कौतुक केलं आहे.
क्षितिज पटवर्धनने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘चारचौघी’ या नाटकांची कौतुकास्पद पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्याने लिहीलं आहे की, “चारचौघी पाहिलं आज. पहिल्यांदा आलं तेव्हा मी ५ एक वर्षांचा असेन. मग एकांकिका करायच्या काळात नाटकांची पुस्तकं वाचायची ओढ किंवा खोड म्हणा, लागल्यावर चारचौघी, चाहूल, ज्याचा त्याचा प्रश्न अशी सिरीयस पण दर्जेदार आशयघन नाटकं वाचली. त्यातली सगळ्यात भारी गोष्ट वाटायची पहिल्या प्रयोगाची माहिती. या संस्थेने या वेळेला इतक्या वाजता हा प्रयोग केला. दोन क्षणाकरता पानावरुन मंचावर मन जाऊन यायचं. त्यातलंच एक चारचौघी. आज २२२ व्या प्रयोगाला तुडुंब भरलेल्या नाट्यगृहात पाहता आलं. नाटक फार अप्रतिम रंगलं.”
हेही वाचा : गौरी सावंत यांच्याबरोबर ‘ताली’ टीमनं पाहिलं ‘चारचौघी’ नाटक; रवी जाधव म्हणाले, “असं क्वचितच…”
“नाटकं जुनं आहे पण जून नाही हे या नाटकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यामध्ये पुरुष करत असलेली मारहाण, व्यसनं, कर्जबाजारी पणा अशी त्यांना पटकन व्हिलन बनवणारी मांडणी नाही. सोपा व्हिलन नाही त्यामुळे सोपं सोल्युशन नाही. आजचा रायटिंगच्या एका टीप मध्ये वाचलं की ‘पात्रांना सोल्युशन देऊ नका, सिच्युएशन द्या, मग ते निर्णय घेतील’ आणि त्यांचं तंतोतंत उदाहरण प्रशांत सरांच्या लेखणीत पाहायला मिळालं. ते अजून पाहायला आवडेल. आजच्या जगण्याबद्दल असं म्हणणं त्यांच्या लेखणीतून आलं तर फार मजा येईल.”
हेही वाचा : Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो
पुढे क्षितिजनं लिहीलं आहे की, “चंदू सर आणि थिएटर हे देखणं समीकरण आहे. मुलीच्या लग्नाच्या मांडवात बापाची जी अवस्था असते ती त्यांची प्रयोगाला असते, बहुतेक याचं कारण ते नाटक अक्षरश: पोटच्या पोरासारखं वाढवतात. त्यांनी हे नाटक सफाईने आणि तितक्याच सच्चेपणाने उभं केलंय. पहिली बाजू त्यांचा हातखंडा आहे आणि दुसरी, त्यांचं वैशिष्ट्य.”
“रोहिणीताई, पर्ण, कादंबरी आणि मुक्ता. माझ्या आवडत्या चार अभिनेत्री एकत्र. सगळ्यांनी अतिशय अप्रतिम कामं केलीयेत. मुक्ताच्या एन्ट्रीला प्रेक्षकांमधून जो संपूर्ण शांततेचा लांबलचक मोमेन्ट आला ना तो मी गेली अनेक वर्ष अनेक नाटकात मिस करत होतो. (तिच्याच फायनल ड्राफ्टमध्ये तो आला होता) मुक्ताच्या आणखी प्रेमात पडावं असं काम तिने केलंय! रोहिणीताईंची असंख्य पावसाळे पाहिलेली समज, पर्ण चा खराखुरा वाटावा असा संभ्रम, कादंबरीचा अप्पलपोटी नात्याचा अपेक्षारहित स्वीकार सगळंच प्रत्ययकारी! चारचौघीतले ते तिघे पण लक्ष वेधून घेतात, श्रेयस, निनाद आणि पार्थ यांनी पण कडक कामं केलीयेत. तांत्रिक बाजूही भक्कम.”
हेही वाचा – “ती जागा हाफ चड्डीची नाही”, गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रात…”
“चारचौघी मध्ये एक प्रसंग आहे, ज्यात चारही बायका आपण कोणत्या प्रकारची साडी आहोत ते सांगतात, त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, एखाद्या बाईला आपल्याच जुन्या कपाटात एक साडी दिसते जी तिने अनेक वर्षांपूर्वी घातली होती, ती त्याचा वास घेते, मग उघडून त्याचा पोत न्याहाळते, रंगावरून हात फिरवते, आणि पुन्हा नेसते. मराठी रंगभूमीला “चारचौघी” नावाची इतकी सुंदर ठेवणीतली साडी आत्ता सापडलीय हे फार बरं झालंय. मराठी व्यावसायिक रंगभूमी किती सुंदर दिसू शकते हे त्यामुळेच कळतंय. मजा आली,” अशा शब्दात क्षितिजनं ‘चारचौघी’ या नाटकाच कौतुक केलं आहे.
दरम्यान, ‘चारचौघी’ या मूळ नाटकाचा पहिला प्रयोग मराठी रंगभूमीवर १९९१ रोजी सादर झाला होता. यामध्ये दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या.