Maylek Trailer: मराठी चित्रपट ‘मायलेक’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. खरं तर नावावरूनच हा चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, असं दिसून येतं. मायलेकीचं नातं, त्या नात्यातील चढ-उतार, प्रेम, भांडणं, रुसवे-फुगवे सर्व यात पाहायला मिळणार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. यामध्ये सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव हे कलाकार उपस्थित होते.
ट्रेलरमध्ये माय-लेकीचे स्ट्राँग बाँडिंग दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचेही दिसतेय. आता हा दुरावा का येतोय, हा दुरावा दूर होतो का, यात उमेशची भूमिका काय? या ‘मायलेक’ पुन्हा एकत्र येणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत.
ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आई आणि मुलीची सुंदर केमिस्ट्री ‘मायलेक’मधून पाहायला मिळणार असून १९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाबद्दल निर्माती, अभिनेत्री सोनाली खरे म्हणते, ”हा चित्रपट प्रत्येक आईमुलीची गोष्ट सांगणारा आहे. खूप संवेदनशील असे हे नाते आहे. हे नाते कधी मैत्रीचे असते तर कधी एका वेगळ्याच वळणावर जाते. त्यामुळे हे नाजूक नाते उत्तमरित्या, विचारपूर्वक हाताळणे खूप गरजेचे आहे. ‘मायलेक’मधून कोणताही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील ‘मायलेकी’ची ही जोडी आहे. ज्या धमाल, मजामस्ती करत आहेत. वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकींना साथही देत आहेत. त्यामुळे ‘मायलेक’ तुम्हाला विशेषतः आईमुलीला खूप जवळचा वाटेल. माझे आणि सनायाचे नातेही असेच आंबटगोड आहे. त्यामुळे पडद्यावर या व्यक्तिरेखा साकारणे सहज शक्य झाले. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.”