‘अगंबाई अरेच्चा २’ फेम अभिनेत्री मीरा जोशी काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. मीराला भीषण कार अपघाताला सामोरं जावं लागलं. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तिचा अपघात झाला. या अपघातामधून मीरा सुखरुप बाहेर पडली. सोशल मीडियाद्वारे गाडीचे फोटो पोस्ट करत तिने या अपघाताबाबत माहिती दिली होती. कारची अवस्था पाहून मीरालाही खूप दुःख झालं होतं. आता तिने एक नवी पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मीराने तिचा कारबरोबरचा फोटो शेअर केला होता. कारबरोरचा फोटो शेअर करत मीरा म्हणाली, “निरोप देणं नेहमीच कठीण असतं”. शिवाय फोटोंमध्ये तिचा चेहरा उदास दिसत होता. आता तिने चक्क नवी कार खरेदी केली आहे. नव्या कारचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये मीरा व तिचे कुटुंबीय कारची पूजा करताना दिसत आहेत. मारुती सुझुकी कंपनीची सेलेरियो कार मीराने खरेदी केली आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य”. मीराने हा व्हिडीओ शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार अपघातानंतर मीरा पुरती खचली होती. तिने त्यादरम्यान व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं की, “प्रिय सखी, किती आणि कुठे-कुठे भटकलो ना आपण… रात्रं-दिवस, ऊन-वारा, पाऊस, चढ-उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाही”.