मराठी अभिनेत्री मिताली मयेकरनं अवघ्या १३ व्या वर्षात इरफान खान अभिनीत ‘बिल्लू’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ अशा अनेक मालिकांमधून मिताली प्रसिद्धीझोतात आली. मिताली आपल्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करीत असते. विनोदी रील्स, ट्रॅव्हल्स व्हिडीओ अशा प्रकारच्या कॉन्टेन्ट्सचा त्यामध्ये समावेश असतो. अशातच मितालीनं सोशल मीडियावर एक किस्सा शेअर केला आहे; ज्यात एकदा ती स्वत:चं नाव विसरली होती.
मितालीनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात मितालीने तिच्या चिंताग्रस्त स्वभावाबद्दल भाष्य केलं आहे. मिताली म्हणाली, “मी तुम्हाला एक विनोदी वस्तुस्थिती सांगते. बँका, रुग्णालयं, विमानतळ, व्हिसा अर्ज केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी माझी चिंता खूप वाढते. मला असं वाटत राहतं की, माझ्या कागदपत्रांकडे ते एकदा नजर मारतील आणि सांगतील की, तुमची सगळी कागदपत्रं चुकीची आहेत आणि आता तुम्ही घरी जाऊ शकता.”
हेही वाचा… लक्ष्मीच्या पावलांनी : नयना प्रेग्नंट अन्…; कलाने उघड केलं राहुलचं सत्य, पाहा प्रोमो
मिताली पुढे म्हणाली, “माझी आज एक व्हिसा अपॉइंटमेंट होती आणि अर्थात, मी खूप चिंताग्रस्त होते. मी तिकडे गेले. जो माणूस या संदर्भात मला मदत करणार होता, तो मला भेटला. मी माझी कागदपत्रं त्याला दिली आणि त्यानं मला सांगितलं की, कॅमेऱ्याकडे बघा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. मग मी कॅमेऱ्याकडे बघितलं. त्यानं माझं नाव विचारलं आणि मी शांत राहिले. मी माझ नावच विसरले. मी तिकडेच स्तब्ध झाले आणि माझं नाव विसरले. तो हसू लागला. मग थोडाफार आत्मविश्वास जमा करून, मी म्हटलं, मिताली मयेकर. नंतर त्यानं मला जन्मतारीख विचारली आणि मी लगेच म्हणाले, ८८२८… आणि मी लगेच थांबले. कारण- मी जन्मतारीख सांगण्याऐवजी माझा मोबाईल नंबर सांगत होते.”
“पाच दिवसांची सर्व तयारी, प्रत्येक कागदपत्र तयार करणं आणि त्यासाठी दर १० मिनिटांनी माझ्या पतीला त्रास देणं. हे सगळं मी या गोष्टीसाठी केलं. तुमच्यापैकी कोणाबरोबर असं कधी होतं का? की तुम्ही खरंच नॉर्मल आहात? कृपया मला सांगा! मला बरं वाटण्यासाठी खोटं बोललात तरी चालेल.” चाहत्यांची प्रतिक्रिया विचारत मितालीनं असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.
मितालीच्या या व्हिडीओला अनेक कलाकार आणि चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या आहेत. “शंखपुष्पी प्यायचं बाळा.. रोज २ चमचे”, अशी मजेशीर कमेंट मितालीच्या पतीनं म्हणजेच सिद्धार्थनं केली आहे. पूजा सावंतची बहीण रुचिरानं “मीपण हेच केलं असतं”, अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “म्हणूनच अजून मी माझ्या लग्नाची नोंदणी केलेली नाही.”
हेही वाचा… खरे कुटुंबाची मजेशीर रील व्हायरल; नेटकरी म्हणाले, “ये औरत ना…”
दरम्यान, मितालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर, एकमेकांना बरीच वर्षं डेट केल्यानंतर २१ जानेवारी २०२१ रोजी मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लग्नबंधनात अडकले. श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात सिद्धार्थ झळकला होता; तर ‘उर्फी’, ‘हॅशटॅग प्रेम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये मितालीनं नायिकेची भूमिका साकारली आहे. मिताली सध्या सोशल मीडियावर सक्रिय असून, ती कॉन्टेन्ट तयार करून ब्रॅंड्सबरोबर काम करते.