मिताली मयेकर व सिद्धार्थ चांदेकर मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. सिद्धार्थ व मिताली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा फोटो शेअर करत ते एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत असतात. नुकतंच सिद्धार्थने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या सगळीकडेच उकाड्याचा त्रास जाणवत आहे. तापमान प्रचंड वाढल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत. अशातच उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ताक, लस्सी, कोकम सरबत अशा शीत पेयांचा आधार घेतला जातो. मितालीनेही शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ताक ऑर्डर केलं होतं. परंतु, तिने तब्बल आठ लिटर ताक ऑर्डर केलं. याचा व्हिडीओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
सिद्धार्थ व्हिडीओमध्ये “माझ्या बायकोला मी ताक मागवायला सांगितलं होतं. मी तिला ७-८ टेट्रा पॅक्स मागव, असं म्हणालो होतो. तिने तब्बल आठ लीटर ताक मागवलेलं आहे,” असं म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने “जर कुणाला हावं असेल तर मला कळवा. योग्य दरात ताक मिळेल,” असं कॅप्शन दिलं आहे. सिद्धार्थने शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत असून यावर सेलिब्रिटी व चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
हेही वाचा>> शहनाझ गिलबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर राघव जुयालने सोडलं मौन, म्हणाला…
सिद्धार्थ व मितालीने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. २४ जानेवारी २०२१ रोजी विवाहबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली.