मराठी सिनेविश्वात अनेक एव्हरग्रीन चित्रपट आहेत, या चित्रपटांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. असाच एक सिनेमा २०१५ मध्ये म्हणजेच बरोबर १० वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीच पण, याशिवाय लाखो मराठी माणसांना या चित्रपटाने मैत्रीची एक नवीन व्याख्या शिकवली. या सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने यामधील मुख्य अभिनेता स्वप्नील जोशीने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वप्नीलने त्याच्या सिनेविश्वातील कारकिर्दीत अनेक विषयांवर आधारित चित्रपट करून नवनवीन भूमिका साकारल्या. त्याच्या प्रत्येक भूमिका या तितक्याच खास आणि रोमँटिक असतात. ‘मितवा’मधील स्वप्नीलच्या भूमिकेने केवळ प्रेक्षकांचं मन जिंकलं नाही तर तरुण वर्गाला सुद्धा वेड लावलं! ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ अशा चित्रपटांमधून तयार झालेली स्वप्नीलची लव्हरबॉयची इमेज स्वप्नीलने ‘मितवा’मध्ये अजून उत्तमपणे साकारली. त्याचा वाट्याला आलेले इमोशनल आणि रोमँटिक सीन्स त्याने विलक्षण केले आणि म्हणून स्पप्नीलला पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी उसळली होती.

‘मितवा’ सिनेमाबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना स्वप्नील म्हणतो “मितवा आमच्या आयुष्यातला खूप महत्वपूर्ण सिनेमा आहे त्याला अनेक कारणं आहेत. चित्रपटाची कथा, त्याचं नाव यामुळे या चित्रपटातलं वेगळेपण लक्षात राहतं. शंकर एहसान लॉय याचं संगीत असलेली गाणी माझ्यावर चित्रित झाली ही खूपच भाग्याची गोष्ट या चित्रपटामुळे माझ्याबरोबर घडली. सोनली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरेसारख्या अत्यंत गुणी कलाकार मैत्रीणी या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्याबरोबर जोडल्या गेल्या. ‘मितवा’ ही मराठी सिनेमा विश्वातील आगळी वेगळी लव्हस्टोरी होती आणि मितवा होण्यापूर्वी अनेक लव्हट्रँगल्स कथा पडद्यावर आल्या पण, त्या इतक्या चालल्या नाहीत. हार्डकोर लव्हस्टोरी असलेला ‘मितवा’ चित्रपटगृहात खूप उत्तम चालला.”

“मराठी चित्रपटसृष्टीत हेलिकॉप्टरमधून उतरणारा अभिनेता दाखवणं असो किंवा दमदार लव्हसाँग करणं असो हे सगळं मितवामुळे शक्य झालं. ज्या गोष्टीसाठी आपण बॉलीवूड चित्रपट पाहायचो त्याला तोडीस तोड देणारा ‘मितवा’ मराठीमध्ये घडला याचा खूप आनंद आहे. शिवम सारंग हे पात्र आजही माझ्या तितकंच खास आहे. ‘मितवा’ चित्रपटाची संपूर्ण टीम ही अनेक गोष्टींमुळे माझ्याशी जोडली गेली आणि आजही मला रोज फॅन भेटतो तो नक्की चित्रपटाच्या शेवटाबद्दल तोंड भरून कौतुक करतो आणि सांगतो की, सर असा शेवट मराठी सिनेमात आजवर पाहिला नाही. प्रेक्षकांचं प्रेम मला ‘मितवा’ने दिलं आणि मी कायम याबद्दल सर्वांचा ऋणी असेन” असं स्वप्नील जोशीने सांगितलं.

‘मितवा’ सिनेमाने १० वर्षांपूर्वी प्रदर्शित होऊन सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं होतं. या सिनेमाने तब्बल १३.५ कोटींची कमाई केली होती. आगळीवेगळी कथा असल्याने हा सिनेमा सर्वांच्या पसंतीस उतरला होता.

प्रार्थनाच्या कास्टिंगचा किस्सा

प्रार्थनाला हा सिनेमा ‘नाईन एक्स झक्कास हिरोईन हंट’ मधून मिळाला होता. ही स्पर्धा प्रार्थना जिंकली होती आणि त्यानंतर ‘मितवा’ सिनेमासाठी स्वप्नील जोशीने प्रार्थनाला निवडलं होतं. दरम्यान, सिनेमात स्वप्नील, सोनाली आणि प्रार्थना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. स्वप्ना जोशी- वाघमारे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

Story img Loader