Atul Parchure Passed Away: ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. परचुरे यांच्यावर आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अतुल परचुरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले तेव्हाचा व्हिडीओ समोर आला आहे.

नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अतुल परचुरे यांची सोमवारी (१४ ऑक्टोबर रोजी) प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर चाहते व मराठी कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून भावना व्यक्त करत आहेत. अतुर परचुरे यांचं पार्थिव राहत्या घरी नेण्यात आलं, तिथे जाऊन राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा- Atul Parchure : अतुल परचुरेंना पुलंचा आशीर्वाद कसा लाभला होता? पेटीवर वाजवून दाखवलेल्या ‘कृष्ण मुरारी’ गाण्याचा किस्सा काय?

राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे अतुल परचुरेंच्या घरी जातानाचा व्हिडीओ विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या घरी जाऊन राज व शर्मिला यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

राज ठाकरे यांनी अतुल परचुरेंसाठी केली पोस्ट

अतुल परचुरे यांच्या निधनाबद्दल कळताच राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. “आज आमचा अतुल गेला…. एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

हेही वाचा : ५ सेमीचा ट्यूमर, डॉक्टरांकडून चुकीचे उपचार…; अतुल परचुरेंनी सांगितलेला ‘तो’ कठीण काळ, अखेर झुंज अपयशी

शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता, पण आमच्या साठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता ! कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेजेस वेगळी होती तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांड्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली.

मी जेंव्हा पक्ष स्थापन केला, तेंव्हा अतुलने पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेंव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेंव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेंव्हा तो खंगला होता, तेंव्हा तो आमच्या मित्रांपैकी कोणालाच बघवत नव्हता.
पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता.

मी म्हणलं तसं अतुल हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने अकाली ‘एक्झिट’ घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला.

आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली,” अशी पोस्ट राज ठाकरे यांनी एक्सवर केली.