दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली. हा चित्रपट दिवाळी २०२३मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा करताना यामध्ये सात वीरांच्या भूमिका कोणते कलाकार साकारतील, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थित चित्रपटाची घोषणा
महेश मांजेरकरांच्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या फर्स्ट लूकची झलक यावेळी दाखवण्यात आली. याशिवाय प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची, उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांची, सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची, विराट मडके जिवाजी पाटलांची, जय दुधाणे तुळजा जामकर यांची, हार्दिक जोशी मल्हारी लोखंडे यांची आणि विशाल निकम चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
पाहा व्हिडीओ –
चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी एका व्यक्तीचं विशेष कौतुक केलं, ती व्यक्ती म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर होय. राज ठाकरे म्हणाले, वेडात मराठे वीर दौडले मधला वेडात धावणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे महेश मांजरेकर आहे. प्रत्येक वेळी तो एक नवं आणि भव्य स्वप्न तो घेऊन येतो. या चित्रपटाची गोष्ट पाच वर्षांपूर्वी महेशने मला सांगितली होती. त्यावेळी मी त्याला म्हटलं होतं की ही खूप भव्य गोष्ट आहे, मराठीत हा चित्रपट बनवणं, कसं शक्य होणार. पण अखेर चित्रपटाला चांगले निर्माते मिळाले. त्यामुळे ही गोष्ट शक्य झाली. आज मराठी चित्रपट कात टाकून पुढे जातोय, याचं श्रेय महेश मांजरेकर यांचं आहे. चित्रपट नावाची गोष्ट ज्यांना कळते, अशी मराठीत बोटावर मोजण्याइतकी लोक आहेत, त्यात महेश मांजरेकरांचा समावेश आहे,” असं म्हणत राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं कौतुक केलं.