केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत ७० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्मात्यांनी १०० रुपयांत सिनेमा पाहण्याची खास ऑफर सुरु केली आहे. नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर या दोन दिग्गजांनी केदार शिंदे आणि प्रमुख अभिनेत्रींच्या उपस्थितीत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिला होता.
हेही वाचा : AskSrk : “शाहरुख सर शिव्या द्या, पण…”, चाहत्याच्या अजब मागणीवर किंग खान म्हणाला, “जॅकी श्रॉफकडून…”
‘बाईपण भारी देवा’ चित्रपट कसा वाटला याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये राज ठाकरे सांगतात, “जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा घरी येऊन बायकोला याच्या कथेबाबत सांगितले. माझ्या पत्नीशी चर्चा करताना मी म्हणालो, ‘हा बायकांप्रमाणे प्रत्येक पुरुषाने पाहावा असा चित्रपट आहे.’ आपल्या माता-भगिनी कशामधून जात असतात हे प्रत्येक पुरुषाने समजून घेण्याची गरज आहे.”
“महिलावर्ग चित्रपटगृहांमध्ये जाऊन त्या कथेशी स्वत:ला रिलेट करत आहेत… हे सर्वकाही आलेच परंतु, पुरुषवर्गाने त्यांच्यासह हा चित्रपट पाहणे जास्त गरजेचे आहे. चित्रपट पाहून आयुष्यात सुरु असलेल्या चुकीच्या गोष्टी बाजूला काढण्यासाठी पुरुषांनी चित्रपट जरूर पाहावा. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सर्वात मोठे यश त्याच्या कथानकात आणि दिग्दर्शनात आहे.” असे राज ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा : “अवघ्या २ दिवसांत…”, ‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ दिग्दर्शक केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “हा सिनेमा “तिने” डोक्यावर घेतला. पण खरंतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तिचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तिचा मान सन्मान राखा. या शुक्रवारपासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटरमध्ये वाट पाहतोय…” असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.