मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कलेशी फार जवळचं नातं आहे. नुकतंच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिलं. हे नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे.
राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि नाटकातील कलाकारांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये “नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या ‘धक्क्याने’ नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आली”, असं म्हटलं आहे.
हेही वाचा >> “सहा महिन्यानंतर अजून कोणावर बलात्काराची केस…”, साजिद खानवर आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्रावर राखीची गंभीर टीका
पुढे त्यांनी “पण वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं. निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छादेखील”, असं म्हणत नाटकातील सर्वच कलाकारांचं कौतुक केलं आहे.
हेही पाहा >> Photos : देवेंद्र फडणवीसांना जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची भूरळ, म्हणाले “हा चित्रपट …”
‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकांत अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांच्यासह तन्वी पालव, रेणुका बोधनकर, प्रथमेश चेऊलकर, सागर खेडेकर या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केले आहे.
राज ठाकरेंना चित्रपट, नाटक पाहण्याची आवड असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. ‘हर हर महादेव’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक मराठी चित्रपटाला त्यांनी आवाजही दिला आहे. त्यांच्या आवाजातील चित्रपटाची झलक ट्रेलरमध्ये दिसल्यानंतर या चित्रपटाबद्दल चाहते अधिकच उत्सुक होते.