Mohan Joshi : ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं आहे. बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायक किंवा नकारात्मक छटा असलेली पात्रे त्यांनी साकारली. त्यांनी अनेक सकारात्मक भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. पण खलनायक बनल्यानंतरही मोहन जोशी प्रसिद्ध झाले आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हिंदीसह मराठीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे मोहन जोशी एकेकाळी ट्रक ड्रायव्हर होते. अशातच मोहन जोशी यांनी त्यांच्यावर अपघाताची केस झाल्याचा प्रसंग सांगितला आहे.

मोहन जोशींनी सांगितला ट्रकच्या अपघाताचा प्रसंग

मोहन जोशींवर अपघाताबद्दल केस झाली होती आणि ही केस जवळपास वर्षभर चालली. ‘बातों बातों में बाय कांचन’ या पॉडकास्टमध्ये त्यांनी या अपघाताच्या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. याबद्दल ते म्हणाले की, “ड्रायव्हर एक गाडी घेऊ हैदराबादला गेला होता आणि मी दुसऱ्या गाडीत शिवमोगासाठी पॅटर्न (लोखंडी सामान) भरले होते. तो हैद्राबादवरुन आला आणि मी त्याला विचारलं की, शिवमोगासाठी तू जाशील का? तर तो हो म्हणाला. मग तो गेला. आमची काही ठिकाणे ठरलेली होती. तिथे जाऊन फोन करायचा.”

“ऊसाच्या ट्रकला धडक झाली अन् त्यात चार-पाच जण गेले”

यापुढे त्यांनी सांगितलं की, “मला गाडीचा आणि कोण कधी कुठे किती वाजता पोहोचत आहे यांचा अंदाज होता. तो शिवमोगाला पोहोचल्याचा आणि तिथून निघल्याचा मला फोन आला. शिवमोगाहून निघाल्यानंतर हुबळीला थांबायचं आणि आराम करून पुन्हा सकाळी निघायचं हे ठरलेलं होतं. पण हा पठ्ठ्या रात्री लिंबं आणि चार मुसलमान घेऊन निघाला. ती चार मुलं सगळी तरुण होती. त्यांना घेऊन तो आला आणि निपाणीजवळ उसाचा ट्रक उभा होता. तर त्या ट्रकला मागून धडकला आणि बाऊन्स होऊन दुसऱ्या ट्रकला पुन्हा आदळला आणि त्यात चार-पाच जण गेले.”

“अपघाताबद्दल कळलं तेव्हा रडायलाच आलं”

यापुढे मोहन जोशींनी सांगितलं की, “या अपघातामुळे हायवेही चार तास जाम होता. मला कळलं तेव्हा रडायलाच आलं. त्यानंतर इनामदार म्हणून बेळगावमध्ये सप्लायर होते. त्यांनी काळजी करु नका, इथे दौलतराव मुतकेकर म्हणून वकील असल्याचं सांगितलं. तर मी मुतकेकरांबरोबर काम केलं आहे. एका सिनेमात ते माझ्याबरोबर होते. मग त्या अपघाताची केस सुरू झाली आणि निपाणीमध्ये केस सुरू झाल्याने कन्नड भाषेत ती सुरू झाली. कन्नड भाषा मला येत नव्हती. त्यामुळे मी मुतकेकरांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की, असा असा अपघात झाला आहे आणि त्यात चार माणसे गेली आहेत.”

“वर्षभर साडे आठ लाख रुपयांची केस सुरू होती”

यानंतर मोहन जोशी म्हणाले की, “इन्श्यूरन्स आणि परमीट असल्याचंही मी त्यांना सांगितलं. मग ते काही काळजी करु नका असं म्हणाले. तेव्हा वर्षभर साडे आठ लाख रुपयांची ती केस सुरू होती. म्हणजे मी भीकेलाच लागलो असतो. पण त्यांनी ती केस निभावली आणि ते गाडीतील लिंबांमुळे… त्या चौघांनी लिफ्ट मागितली होती शिवाय लिंबंही होती. कारण गाडीत सामान नसेल तर तुम्ही माणसं घेऊन जाऊ शकता. पण ते असं सगळं झालं.”