राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. बंडखोरी करून शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेला अजित पवार गटच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असं निवडणूक आयोगाने मंगळवारी (६ फेब्रुवारी) म्हटलं आहे. या निर्णयानंतर शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा प्रयोगातील आहे, ज्यात अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही. कालही… आजही…!!!’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. “इथल्या पाण्याच्या थेंबाथेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या सळसळत्या रक्ताचा हा अंगार या मनामनात धगधगता ठेवाल. कटकारस्थानं होतंच राहतील, या ना त्या मार्गाने विष प्रयोग होतच राहतील. या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजीरुपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल आणि सळसळेल मराठमोळ्या धमन्यांमध्ये,” असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.
पक्षनाव, चिन्ह अजित पवारांना; निवडणूक आयोगाचा निर्णय, न्यायालयात जाण्याची शरद पवार गटाची घोषणा
दरम्यान, केंद्रीय निवडूक आयोगासमोर गेल्या सहा महिन्यांमध्ये १० हून अधिक सुनावण्या झाल्या. दोन्ही गटांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे व युक्तिवादानंतर अजित पवार गटच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आयोगाने दिला. या निर्णयानंतर अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. त्यावर “आम्ही मराठीच आहोत. त्यामुळे पक्ष पळवण्याचा प्रश्न येतोच कुठे?”, असं अजित पवार म्हणाले.