मराठी कलाविश्वात सध्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाचे कथानक शिवराज अष्टक मालिकेतील पाचवे चित्रपुष्प सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारलेले आहे. या मालिकेतील सगळ्या चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरने ‘छत्रपती शिवाजी महाराज’ तर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘राजमाता जिजाऊ’ यांची भूमिका साकारली आहे. मात्र, ‘सुभेदार’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळे हे तिघेही एकत्र काम करणार आहेत.
हेही वाचा : “मी १२ महिने नियमांमध्ये जगणारी मुलगी…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
‘सुभेदार’चा ट्रेलर नुकताच पुणे येथे लॉन्च करण्यात आला. यावेळी मीडियाशी संवाद साधताना मृणाल कुलकर्णी यांनी पहिल्यांदा सून आणि लेकासह काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी सांगितले आहे. मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “शिवराज अष्टक मालिकेच्या निमित्ताने आमचे एक कुटुंब तयार झाले आहे. या कुटुंबामध्ये विराजस-शिवानी ही माझी मुलं नव्हती याबद्दल माझ्या मनात शल्य होते. पण, दिग्पालने माझ्या नकळत त्यांना फोन करून त्यांची या भूमिकेसाठी निवड केली. माझ्यासाठी हा आश्चर्याचा गोड धक्का होता.”
मृणाल कुलकर्णी पुढे म्हणाल्या, “आपण नेहमी म्हणतो पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कसा पोहोचणार? पण, आज माझी पुढची पिढी शिवरायांचा इतिहास सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाली आहे याचा मला निश्चितच आनंद आहे. आमचे शूटिंगचे शेड्यूल एकत्र नव्हते, भूमिका वेगवेगळ्या आहेत तरीही एकत्र चित्रपटात काम करण्याचा आनंद आहे.”
दरम्यान, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, स्मिता शेवाळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच या चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय पूरकर यांनी साकारली आहे.