मृणाल कुलकर्णी यशस्वी अभिनेत्री आहेतच पण, या जोडीला त्यांनी वैयक्तिक आयुष्यात घराची जबाबदारी देखील उत्तमपणे सांभाळली. विराजसने आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मालिकाविश्वात काम केल्यावर सध्या तो रंगभूमीवर सक्रियपणे काम करतोय. याशिवाय मृणाल कुलकर्णींची सून शिवानी रांगोळे सुद्धा छोटा पडदा गाजवाना दिसतेय. कलाविश्वात काम करताना अनेकदा घर-संसार याकडे दुर्लक्ष होतं. यासाठी योग्य वयात आपल्या मुलांवर जबाबदाऱ्या टाकणं किती महत्त्वाचं असतं? आजची पिढी किती परिपक्व आहे? याचं सविस्तर उत्तर मृणाल कुलकर्णींनी ‘आरपारला’ दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे.

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “माझ्या मुलांमध्ये खूप मॅच्युरिटी आहे असं मला वाटतं. कारण, ज्या वयात त्यांच्यावर, ज्या जबाबदाऱ्या टाकायला पाहिजेत त्या मी टाकलेल्या आहेत. याचं उदाहरण सांगायचं झालं, तर मी पुण्यात असते. पण, शिवानी आणि विराजस कामानिमित्त मुंबईत असतात. मी त्यांना सांगून ठेवलंय की, मुंबईचं घर हे तुम्ही चालवायचं…तिथे काय हवं नको, एसीची दुरुस्ती, गाड्यांची देखभाल, घरातील अन्य समस्या हे सगळं तुम्ही पाहायचं. त्यांचं लग्न झाल्यावर हळुहळू मी त्यांच्यावर मुंबईच्या घराची संपूर्ण जबाबदारी सोपवली.”

मुलांवर जबाबदारी का टाकावी याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाल्या, “मी बीएची परीक्षा दिली आणि चार दिवसांनी लगेच माझं लग्न झालं होतं. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा, मी आणि रुचिर तेव्हा खूपच लहान होतो. पण, तेव्हा बाबांनी आमच्यावर बिलकूल काहीच जबाबदारी टाकली नव्हती. माझ्या घरी आम्ही चौघंजण होतो, त्यामुळे माहेरी मला सगळं करायची सवय होती. कुलकर्णी कुटुंबात लग्न झाल्यावर आमचं कुटुंब मोठं होतं. त्यामुळे माझं तेव्हाच ठरलं होतं की, भविष्यात आपल्या मुलांना योग्य वयापासूनच सगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्या. त्यामुळे मुलांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास येतो.”

अभिनेत्री पुढे सांगतात, “विराजसचं बँक अकाऊंट मी खूप कमी वयात उघडलं होतं. त्या अकाऊंटबद्दल त्याला सगळं शिकवलं. कॉलेज झाल्यावर मी त्याला पॉकेटमनी देणं बंद केलं. यामुळे विराजसला किती काम केलं की किती पैसे मिळतात? कोणत्या क्षेत्रात काय काम केलं की काय मिळू शकतं? किंवा खर्च किती होतो याचा अंदाज तेव्हाच आला होता. या गोष्टी मुलांना समजल्या पाहिजे आणि आता लग्न झाल्यावर शिवानी आणि विराजस सुद्धा खूप लक्ष देऊन सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करतात.”

“आपण मुलांच्या पाठिशी कायम उभे असलो तरीही, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं महत्त्वाचं असतं. यामुळे त्यांना पैशांचं महत्त्व कळतं, जबाबदारीची जाणीव होते, आई-बाबा कायमबरोबर आहेत ही भावना सुद्धा त्यांच्या मनात असते. माझे पती रुचिरचे विचार वेगळे आहेत. त्यांना वाटतं मुलांना कायम जपलं पाहिजे. पण, माझं उलटं आहे…मी म्हणेन, मुलांना स्वतंत्र करून त्यांचा हात सोडायलाच पाहिजे. एक आई म्हणून मला वाटतं, मुलांना तुमच्या शहरापासून एक वर्ष तरी दूर पाठवा. कारण, तुमच्या घराची गल्ली हे संपूर्ण जग नाही हे तुमच्या मुलांना जेवढ्या लवकर समजेल तेवढ्या लवकर तुमची मुलं मोठी होतील.” असं मत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मांडलं आहे.