गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबरला पुण्यात थाटामाटात पार पडला. ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे गौतमी घराघरांत लोकप्रिय झाली. आपली मोठी बहीण मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. देशपांडे बहिणींची जोडी मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघींमध्ये असलेल्या सुंदर बॉण्डिंगचं नेहमीच कौतुक केलं जातं. आता धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर मृण्मयीने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.
मृण्मयी देशपांडेची पोस्ट
अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं… प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली… या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये… आनंद..काळजी..आता ती officially दुसऱ्याची झाली याचं दुःख.. आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद.. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत… काल परवापर्यंत ताईचं शेपूट असणाऱ्या आमच्या बाळाला ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे.. यापुढे आम्हा बहिणींची gossips एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर, “ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल… कारण..? तिचं तिलाच कळेल!
स्वानंद.. तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये… लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होतासच… गौतमी स्वानंदची काळजी घे… स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस… संसार कोणाचाच सोपा नसतो.. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणी वरती मात करता येते.. कदाचित सहज नाही… पण मात करता येते!! एकमेकांवर विश्वास असू द्या… संवाद असू द्या… नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते… एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा… एकमेकांना सांभाळून घ्या… आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत.. सगळ्यांची काळजी घ्या… आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हानीन
हेही वाचा : “मंगळसूत्राच्या दोन वाट्या…”, स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला खास उखाणा, नवऱ्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
दरम्यान, मृण्मयीने शेअर केलेल्या पोस्टवर अमृता खानविलकर, अभिजीत खांडकेकर, मंजिरी भावे या कलाकारांनी कमेंट्स करत या दोघींमध्ये असलेल्या सुंदर बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी या नवीन जोडप्याला कमेंट्समध्ये भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.