‘नाच गं घुमा’ चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. नुकतंच त्याचं प्रमोशनल गाणंही प्रदर्शित झालंय. या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुप्रिया पाठारे, सुकन्या माने अशी तगडी स्टारकास्ट आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची २० वर्षांची घट्ट मैत्री असतानाही एवढ्या वर्षांत पहिल्यांदा दोघी मैत्रिणी या चित्रपटासाठी एकत्र काम करतायत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मधुगंधा म्हणाली, “आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो, नंतर मुंबईत काही काळ एकत्र राहिलो आणि आपापल्या मार्गाला लागलो. आम्ही कधी सहकलाकार म्हणून किंवा लेखिका-अभिनेत्री म्हणून असं एकत्र काम केलं नाही. आम्ही असं काही ठरवलं नव्हत, पण ते कधी जुळून आलं नाही. पण, ‘नाच गं घुमा’ लिहित असतानाच मला असं वाटलं होतं की ही भूमिका मुक्ता करेक्ट करू शकेल. पण, तरीही परेशच्या मनात जरा संदिग्धता होती की कुठली भूमिका कोणी करावी. मग नंतर परेशने मुक्ताला आणि नम्रताला वाचन करायला लावलं आणि त्याच्यानंतर त्याने निर्णय घेतला की, मुक्ता राणीची भूमिका साकारेल आणि नम्रता आशाची भूमिका साकारेल.”

“आम्ही रोज भेटत नाही, पण आम्ही खूप कनेक्टेड आहोत. महत्त्वाच्या प्रसंगांना आम्ही एकमेकांना फोन करतो. माझ्या आयुष्यातले खूप प्रसंग मी अनेकदा तिला सांगितले आहेत. आम्ही कनेक्टेड होतो, फक्त आम्ही प्रोफेशनली काम केलं नव्हत आणि मला आता असं वाटतं की आपणं ते का केलं नसावं.” असं मधुगंधाने नमूद केलं. यावर मुक्ता म्हणाली, “आपण कदाचित ‘नाच गं घुमा’साठी एवढी वर्षे काम केलं नसेल.”

हेही वाचा… “मी जास्तीत जास्त २ हजार रुपये…” कपड्यांवर वायफळ खर्च करण्याबाबत मृणालने मांडलं मत, म्हणाली…

मुक्ताला जेव्हा तिच्या आणि मधुगंधाच्या २० वर्षांच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा मुक्ता बर्वे म्हणाली, “मधुगंधा पहिल्यापासूनच खूप सकारात्मक मुलगी होती. कॉलेजच्या वेळेस ‘चौकटीतला माणूस’ हे मधुगंधाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. ती तेव्हापासूनच उत्तम लेखिका होती. मधुगंधामुळे मला पहिल्यांदा मुंबईत राहता आलं. तिच्यामुळे मी माझ्या आयुष्यातलं पहिलं घर घेतलं. आमच्यात खूप गोष्टी सारख्या आहेत. आम्ही एकमेकींची सगळी कामं बघितली आहेत आणि त्याच्याविषयी टीका टिप्पणी केलीय. हे आवडलं, हे आवडलं नाही, यात बरं कलंयस, यात बर करू शकली असतीस. ही एक पारदर्शकता आहे. आमचं नातं इतकं घट्ट आहे.

हेही वाचा… ‘नाच गं घुमा’ चित्रपटासाठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेने दिलेला नकार; लेखिका खुलासा करत म्हणाली…

दरम्यान, ‘नाच गं घुमा’चं प्रमोशनलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आणि या गाण्यावर रिल बनवणाऱ्या प्रेक्षकांना या टीमने बक्षीसदेखील जाहीर केलं आहे. हा चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून मुक्ता बर्वेसह नम्रता संभेराव, सुप्रिया पाठारे, सुकन्या माने, शर्मिष्ठा राऊत, सारंग साठ्ये यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukta barve and madhugandha kulkarni worked together naach ga ghuma film for the first time after 20 years of friendship dvr