रवींद्र पाथरे

रस्त्यात एखादा खून होत असेल तर तो पाहणारा माणूस शक्यतो आपल्यामागे झंझट लागायला नको म्हणून तिथून झटकन् निघून जातो. उगाच पोलीस, कोर्ट, खुन्यांची भानगड आपल्यामागे लागू नये आणि आपण नस्त्या झमेल्यात अडकू नये अशीच सर्वसामान्यांची इच्छा असते. याच कथाबीजावर आधारलेलं जयंत उपाध्ये लिखित आणि संतोष पवार रंगावृत्तीत तसेच दिग्दर्शित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. म्हटलं तर हा विषय अत्यंत गंभीर. पण या नाटकात तो फार्सिकल कॉमेडीच्या अंगानं हाताळलेला आहे. या नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे संतोष पवार यांची एरव्ही जी नेहमीची नाटकं असतात, त्यापेक्षा हे नाटक वेगळं आहे. त्यांनी आपल्या दिग्दर्शकीय शैलीत नाटकाच्या पिंडप्रकृतीनुसार आवश्यक ते बदल केले आहेत.

Vijay Tapas Drama Ruiya College Marathi Poetry
व्यक्तिवेध: विजय तापस
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
seeing things spectral materialities of Bombay horror
‘बॉम्बे हॉरर’च्या खोलात…
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे
two minor girls sexually abuse maharashtrachi hasyajatra director sachin goswami post
“बदलापूरमध्ये सामान्य माणसांचा उद्रेक हा…”, हास्यजत्रेच्या दिग्दर्शकांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भयंकर, क्लेशदायक…”
Loksatta lokrang Dipa Deshmukh book Directors published by Manovikas Prakashan
भारतीय दिग्दर्शकांची गौरवशाली परंपरा
ti phulrani dramatization by P L deshpande
‘ती’च्या भोवती : आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग!
amol Palekar marathi news
कलावंतांची मुस्कटदाबी कितपत योग्य? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे परखड सवाल

प्रा. माधव कुलकर्णी एकदा घरात असताना बाहेर रस्त्यावर कसलातरी आरडाओरडा ऐकून काय झालंय म्हणून बघायला बाहेर जातात, तर त्यांच्यासमोर बाईकवरून आलेले खुनी एका माणसाचा खून करताना ते पाहतात. घाबरून ते घरात येतात तर एक टीव्ही पत्रकार त्यांच्या घरी येऊन त्यांना खून कसा झाला याबद्दल त्यांचा बाईट घेते. आपण टीव्हीवर दिसू, मग लोक आपल्याला ओळखतील या मोहानं ते बाईट देतात खरे, पण त्याने एकच खळबळ माजते. टीव्हीची पत्रकार त्यांना ‘मर्डरवाले कुलकर्णी’ म्हणून संबोधते. आणि सगळेच जण त्यांच्याकडे ‘मर्डरवाले कुलकर्णी’ म्हणूनच पाहू लागतात. टीव्हीवरील त्यांचा बाईट बघून त्यांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जाबजबाब घेण्यासाठी हवालदार मानमोडे त्यांच्या घरी येतो. त्यामुळे प्रा. माधव कुलकर्णी घाबरतात. हे नस्तं लचांड आपल्या मागे लागलंय, या गोष्टीने ते हैराण होतात. आता पोलीस चौकशी, कोर्ट, खुन्यांची माणसंही आपल्या मागे लागणार हे त्यांना कळून चुकतं. तशात तो खून करणारा शऱ्याही त्यांच्या घरी येऊन त्यांना धमकावतो. शऱ्या धमकावण्यासाठी आलेला असतानाच हवालदार मानमोडेही तिथे चौकशीसाठी येतो. त्यांनी समोरासमोर येऊ नये म्हणून कुलकर्णी खूप खटपट लटपट करतात. पण एका क्षणी तो मानमोडेंसमोर येतोच. तेव्हा सत्य झाकण्यासाठी शऱ्या हा आपला मुलगा असल्याचं कुलकर्णी मानमोडेला सांगतात. आणि मग त्याचाच फायदा उठवत शऱ्या त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्या घरातच मुक्काम ठोकतो.

हेही वाचा >>> “इतकं जुनं झालंय आमचं लग्न…” दिग्दर्शक विजू मानेंची पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “सुरुवातीलाच प्रचंड…”

त्यानंतर जो धुमाकूळ, लपवाछपवी, ती उघडकीला आल्यावर ती झाकण्यासाठी आणखीन नवीन लपवाछपवी.. असा जो काही गोंधळ-गडबड होते, ती म्हणजे ‘मर्डरवाले कुलकर्णी’ ही धम्माल फार्सिकल कॉमेडी होय. लेखक जयंत उपाध्ये यांच्या मूळ नाटकाची संतोष पवार यांनी ही रंगावृत्ती तयार केली आहे. शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, उपहास, उपरोध, विसंगती, विरोधाभास, पीजे यांची बक्कळ रेलचेल नाटकात आहे. प्रत्येक पात्राचे स्वभावविभाव, लकबी यांतून हे नाटक उत्तरोत्तर रंगतदार होत जातं. म्हटलं तर खुन्याचा शोध- आणि त्यात नाहक अडकलेले मर्डरवाले कुलकर्णी यांची फरपट हा या नाटकाचा गाभा. मर्डरवाले कुलकर्णी, त्यांची बावळट्ट बायको माधवी, डोकॅलिटी असलेला हवालदार मानमोडे आणि खुनी शऱ्या, त्याची ‘आयटम गर्ल’ तथा डान्सबारमध्ये काम करणारी रेश्मा यांच्या एकत्रित धामधुमीतून हे नाटक आकारास येतं.

दिग्दर्शक संतोष पवार यांनी या नाटकाचा स्रोत अचूक हेरला आहे आणि त्यानुरूप पात्रयोजना केली आहे. यात त्यांनी अर्धीअधिक बाजी मारली आहे. यातले वैविध्यपूर्ण विनोद, त्यांची जातकुळी यांची पक्की समज दिग्दर्शकाला आहे. फार्सिकल ढंगाने नाटकाची हाताळणी करताना त्यांनी कुठंच कसूर केलेली नाही. वैभव मांगले (मर्डरवाले कुलकर्णी) या विनोदाची जबरदस्त जाण असणाऱ्या कलाकाराने यातल्या बारीकसारीक विनोदाच्या जागा मोठय़ा नजाकतीनं पेलल्या आहेत. काही गद्यं वाक्यं सुरात गाऊन त्यांनी नाटकात एक वेगळाच परिणाम साधला आहे. यातलं त्यांचं ‘नीज माझ्या नंदलाला’ हे गाणं त्यांच्यातल्या अप्रतिम गायकाची झलक दाखवणारं आहे. त्यांचा नाटकातला हसताखेळता वावर हा सहजत्स्फूर्त अभिनयाचा वानवळा ठरावा. त्यांना भार्गवी चिरमुले यांनी तितक्याच बहारीनं साथ केली आहे. बावळट्ट, विनोदातले बारकावे जाणकारीनं दर्शवणारी माधवी त्यांनी ठाशीवपणे साकारली आहे. हवालदार मानमोडेंच्या भूमिकेत विकास चव्हाण यांनी मस्त रंग भरले आहेत. ते कुठेही आपल्या भूमिकेचा तोल जाऊ देत नाहीत, पण आपल्या वाटय़ाचे हशे मात्र पुरेपूर वसूल करतात. गुंड शऱ्या झालेले निमिष कुलकर्णी यांनी खुन्याची मानसिकता, त्याची भाषा नेमकेपणाने पकडली आहे. डान्सबार गर्लची भूमिका साकारणाऱ्या सुकन्या काळण भूमिकेत शोभल्या आहेत. संदेश बेंद्रे यांनी प्रा. माधव कुलकर्णीचं घर छान उभं केलं आहे. रवी-रसिक यांनी प्रकाशयोजनेतून नाटयांतर्गत मूड्स उठावदार केले आहेत. आशुतोष वाघमारे यांनी वैभव जोशी यांच्या गीतांना नाटयानुकूल चाली दिल्या आहेत. तन्वी पालव यांचं नृत्यआरेखन प्रेक्षणीय. शरद सावंत (रंगभूषा) आणि मंगल केंकरे (वेशभूषा) यांनी आपली जबाबदारी नेटकेपणाने निभावली आहे.