महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज(२५ मे) जाहीर करण्यात आला. दुपारी दोन वाजता ऑनलाईन बारावीचा निकाल लागला. मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सलील कुलकर्णी यांच्या मुलानेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती.
सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभम कुलकर्णीला बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळालं आहे. शुभमने बारावीत तब्बल ८९.३३ टक्के गुण मिळवले आहेत. तर Philosophy विषयात त्याने १०० पैकी ९६ गुण प्राप्त केले आहेत. सलील कुलकर्णींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकाचं अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा>> Video : राजकारणातील नवे डावपेच अन् सत्तेसाठी चढाओढ; ‘City Of Dreams 3’मध्ये खास काय?
सलील कुलकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शुभमसाठी खास स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी लाडक्या लेकाचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. “वागणार नाही वाईट साईट राखेल तुमचं नाव, माझे आईबाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव,” हे शुभमने गायलेलं गाणं त्यांनी स्टोरीला दिलं आहे. “शुभमने पाच वर्षांचा असताना गायलेलं हे गाणं आठवलं,” असं कॅप्शन सलील कुलकर्णी यांनी स्टोरीला दिलं आहे.
दरम्यान, राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा ९१.२५ टक्के लागला. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांन अधिक आहे.