गेले दहा दिवस आपल्या बरोबर असलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची आज वेळ आली आहे. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर” या अशा जयघोषात बाप्पाला निरोप दिला जात आहे. ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात गणराय निरोप घेत आहे. यासाठी मोठ-मोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. पण याविषयी एका मराठमोळ्या संगीतकाराने एक मार्मिक पोस्ट लिहिली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.
हा मराठमोळा संगीतकार म्हणजे देवेंद्र भोमे. देवेंद्र मराठी, हिंदी सिनेसृष्टीत आणि मालिकाविश्वात काम करत आहे. त्यानं बऱ्याच मालिकांची शीर्षकगीतं संगीतबद्ध केली आहेत. आज देवेंद्रनं गणपती विसर्जनाविषयी एक मार्मिक पोस्ट लिहिली आहे; ही पोस्ट काही कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा – Video: “मालिका बंद करा”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; नेमकं काय घडलं?
देवेंद्रची ‘ती’ पोस्ट वाचा…
कुणी बोलायचं नाही! मंगलमूर्ती मोरया!…..
मंगलमूर्तीच्या शोधात निघालेल्या अनेकांना आज शहराचं विद्रुप दर्शन झालंच असेल. पण हा आमचा उत्सव आहे त्यामुळे कुणी काहीच बोलायचं नाही! सगळी कामं बंद ठेवून, सर्व रस्ते बंद करून, लहान, मोठे, वृद्ध यांची कुणाचीच पर्वा न करता ‘आमचा आवाज किती मोठा ’ हे दाखवत आम्ही कानठळ्या बसेपर्यंत स्पीकर सिस्टिमचा वापर करणार. मग तुम्ही कुठेही राहत असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणारच. कारण आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातही एकमेकांशी बोलायचं नाही. मुळात बोललात तरी तुम्हाला ते ऐकू येणार नाही. आज फक्त आमचा आवाज! आम्ही दारू पिऊन वर्षभरातील सर्व भावना रिचवत शक्य तितक्या घाणेरड्या प्रकारे अंगविक्षेप करत रस्त्यावरून उंच उभे राहून जाणार. समाजातल्या पुढच्या पिढीला दाखवायला नको का आमची संस्कृती? त्यामुळे कुणीच काही बोलायचं नाही.
लहान मोठे सगळे एकत्र येऊन आम्ही एक मोठा बॅनर छापणार. एक छानसा नवीन गॉगल घालून किंवा गळ्यात एखादी छोटीशी चेन घालून आम्ही आमच्या ओळखीतल्या साधारण ३५० जणांचे फोटो लावणार आणि असे बॅनर आम्ही जमेल तिथे उभे करणार. तसं आमच्या प्रत्येक गल्लीत एक होतकरू राजकारणी असतोच. अगदी एक दिवस सिग्नल दिसले नाहीत तरी चालतील पण आमचे चेहरे आज तुम्हाला बघावेच लागतील. कारण हा आमचा सण आहे, आमचा उत्सव आहे, आमची आमच्या देवावर नितांत श्रद्धा आहे आणि आम्ही या समाजाचा आरसा आहोत.
आम्ही वर्षभर आमच्या हक्कासाठी लढत राहणार, आम्हाला सर्व गोष्टींमध्ये सगळं चांगलं कसं मिळेल हे आम्ही मागत राहणार, पण आम्हाला स्वच्छतेबद्दल कुणीच काही सांगायचं नाही, आज आम्ही कितीही घाणेरडेपणा केला तरी आम्हाला कुणी काहीच बोलायचं नाही. कारण हा आमचा उत्सव आहे आणि आम्हाला आमच्या बाप्पावर खूप प्रेम आहे.
यावर्षी आम्हाला हवं तसं करायचा प्रयत्न तर केला आहे, पण तरी पुढच्या वर्षी अजून नव्या उत्साहानी, काही नवीन कल्पना घेऊन, अजून घाणेरडेपणा करण्यासाठी आम्ही सज्ज असूच, म्हणूनच आज आम्ही आमच्या बाप्पाला सांगितलं आहे की “पुढच्या वर्षी लवकर या!” – आमच्या लाडक्या बाप्पाचा एक भक्त! गणपती बाप्पा मोरया!
हेही वाचा – Chandramukhi 2: कंगना रणौतला मोठा झटका; ‘चंद्रमुखी २’ प्रदर्शित होताच झाला लीक, कमाईवर होणार परिणाम?
हेही वाचा – “आयुष्याची काही वर्ष…” लतादीदींसाठी अभिजीत केळकरनं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…
देवेंद्रच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. “तू बोललास,” असं गौतमी देशपांडेनं लिहीलं आहेत. तर “वास्तव” अशी प्रतिक्रिया स्नेहलता वसईकरनं दिली आहेत.