ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये आढळला होता. ते त्या घरात तीन दिवस मृतावस्थेत पडून होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला निधनाबद्दल माहिती दिली.
रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला खूप ट्रोल करण्यात आलं. वडील एकटेच राहत होते, त्यांच्या निधनाबद्दल मुलालाही दोन दिवस माहीत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. आता त्याबद्दल गश्मीरने ‘इ-टाइम्स’शी बोलताना उत्तर दिलं.
“मी स्मार्ट आहे, पण बाबा…”, देखण्या रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरने केलेलं वक्तव्य
‘माझे वडील परफेक्ट नव्हते, कोणीही नाही’ – गश्मीर
“प्रत्येक व्यक्तीच्या दोन बाजू असतात. प्रत्येकाला आपण परफेक्ट असावं अशी इच्छा असते, परंतु कोणीही परफेक्ट नसतं. मीही नाही आणि माझे वडीलही नाही. आम्ही त्यांना एका लहानशा अपार्टमेंटमध्ये एकटं सोडून दिलं होतं आणि आम्ही ऐशोआरामाचे जीवन जगत आहोत, असं म्हटलंय. पण मला फक्त हेच सांगायचं आहे की त्यांनी गेल्या २० वर्षांपासून एकटं राहणं पसंत केलं होतं. एक कुटुंब म्हणून आमच्याकडे त्यांचं एकटं राहणं स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण तुम्ही एखाद्याला जी गोष्ट करायची नाही ती करायला भाग पाडू शकत नाही,” असं गश्मीर म्हणाला.
Photos: रवींद्र महाजनींनी लेक गश्मीरबरोबर ‘या’ चित्रपटांमध्ये केलं होतं काम; हिंदी सिनेमाचाही समावेश
त्यांना एकटं राहायला आवडायचं – गश्मीर
“खरंतर आमचं नातं एकतर्फी होतं. जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची, तेव्हा ते यायचे. जेव्हा त्यांना एकटं राहू वाटायचं, तेव्हा ते निघून जायचे. माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. ते मूडी होते आणि त्यांना एकटं राहायला आवडायचं. त्यांना त्यांची कामं इतरांनी केलेली त्यांना आवडत नसे. त्यांच्याजवळ आम्ही केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी आम्ही, आमचे जवळचे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मित्रांसह लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती,” असं गश्मीरने सांगितलं.
ते लोकांशी संवाद साधणारे नव्हते – गश्मीर
गश्मीर म्हणाला, “ते शेजार्यांशी संवाद साधणारे किंवा ते जिथे राहायचे तिथे मॉर्निंग वॉक ग्रुपचा भाग बनणारे नव्हते. त्यांच्या मृत्यूबद्दल आम्हाला उशिरा कळण्यामागे हे देखील एक मुख्य कारण होते. सर्वांना मी स्पष्टीकरण देतोय असं वाटू शकतं. मी जे काही बोलतो त्याचे वेगवेगळे अर्थही काढले जातील, पण हरकत नाही.”
काही गोष्टी सार्वजनिकरित्या सांगता येत नाही – गश्मीर
गश्मीर म्हणाला की त्याचे वडील कदाचित सर्वात आदर्श व्यक्ती नसले तरी तो त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष द्यायचा. “अनेक कारणांमुळे आमच्यातील संबंध ताणले गेले, पण ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. यामध्ये खोलवर अनेक वैयक्तिक गोष्टी, अनेक पैलू गुंतलेले आहेत, परंतु कुटुंबातील काही डार्क सिक्रेट सार्वजनिकरित्या उघड केले जाऊ नयेत. ते इंडस्ट्रीतील सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते, त्यांचं हास्य अप्रतिम होतं आणि मी त्यांच्याबद्दलच्या त्याच चांगल्या गोष्टी आठवू इच्छितो,” असं गश्मीरने सांगितलं.