मराठी मनोरंजनविश्वात येत्या काळात नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता लवकरच स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर तब्बल ६ लोकप्रिय अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. तसेच बालकलाकार मायरा वायकुळ देखील ‘नाच गं घुमा’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
“नाच गं घुमा कशी मी नाचू…” हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर चित्रपटातील अभिनेत्रींसह नुकतीच छोटी मायरा थिरकली आहे.
‘नाच गं घुमा’ हे गाणं वैशाली सामंत व अवधूत गुप्ते या दोघांनी गायलं असून या गाण्यात सगळ्या अभिनेत्री मराठमोळा साज करून एकत्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच गाण्यावर मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे आणि सुकन्या मोने यांनी एकत्र रील व्हिडीओ बनवला आहे. याला अवघ्या काही तासांतच दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. सध्या नेटकरी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
‘नाच गं घुमा’मध्ये स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत. यांच्याबरोबर मायराच्या गोड अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. हा बहुचर्चित चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.