‘नाच गं घुमा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाचं कथानक घराघरांतल्या प्रत्येक महिलेला भावलं आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर ओपनिंगलाच या चित्रपटाने दमदार कमाई केली होती. ‘नाच गं घुमा’ने आतापर्यंत एकूण १६ कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. त्यामुळे सध्या मराठी कलाविश्वातून ‘नाच गं घुमा’च्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
‘नाच गं घुमा’मध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मुक्ता बर्वे तिच्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत होती. यावेळी मुक्ताने ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’जवळ ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या शीर्षक गीतावर जबरदस्त डान्स केला होता. याचा व्हिडीओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “प्रेक्षकांच्या प्रेमाचा आणि उदंड प्रतिसादाचा ३ रा आठवडा…घुमा जोरात नाचते आहे…” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा : “तिरडीवर झोपावं लागणार…”, ‘माहेरची साडी’चा क्लायमॅक्स कसा शूट झाला? अलका कुबल यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं शीर्षक गीत गेली दोन महिने इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहे. त्यामुळे या गाण्यावर अभिनेत्रीने न्यूयॉर्कमध्ये भन्नाट डान्स केला. यावेळी मुक्ताच्या जोडीला कादंबरी कदम आणि पर्ण पेठे या दोन अभिनेत्री सुद्धा थिरकल्या. ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’जवळ या तिघींचाही मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. या अभिनेत्रींनी चक्क साड्या नेसून ‘नाच गं घुमा’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
मुक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मुक्ता ताई सुंदर डान्स”, “साडी नेसून भारी डान्स”, “खूप छान साड्या आहेत”, “मस्तच” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडीओवर आल्या आहेत. याशिवाय नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, फुलवा खामकर यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट्स करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा : बाळाच्या जन्मानंतर कार्तिकी गायकवाडने शेअर केला डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ! म्हणाली, “आईची भूमिका…”
दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये मुक्तासह नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे व बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय या चित्रपटाला स्वप्नील जोशी, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, तेजस देसाई, शर्मिष्ठा राऊत आणि तृप्ती पाटील असे सहा निर्माते लाभले आहेत.