मराठी कलाकारांबरोबर प्रेक्षकांचं वेगळं नातं असतं. बॉलीवूडच्या तुलनेत आपले मराठी कलाकार प्रत्येकालाच जवळचे वाटतात. गेल्या काही वर्षांत नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा सगळ्याच माध्यमांमध्ये मराठी कलाकार स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या या सगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची एक वेगळी छाम उमटवणाऱ्या हरहुन्नरी अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
डोळ्यावर मोठा चष्मा, काहीसा वयस्कर लूक, पिकलेले केस अशा लूकमध्ये असलेली ही अभिनेत्री नेमकी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरंतर कॅमेऱ्याच्या फिल्टरद्वारे या संबंधित अभिनेत्रीने हा लूक केला आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने तब्बल २० वर्षांहून अधिक काळ मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं आहे. ही नेमकी कोण जाणून घेऊयात…
सध्या महाराष्ट्रात ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं आहे. यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मुक्ताने हा हटके लूक केल्याचं समोर आलं आहे. “जाने वालों ज़रा, मुड़ के देखो…” हे काहीसं जुनं गाणं असल्याने वयस्कर महिलेचा फिल्टर लूक वापरून हे गाणं उद्या ( ६ मे २०२४ ) तुमच्या भेटीला येईल असं मुक्ता बर्वेने सांगितलं आहे.
“मी परेशकडे जाने वालों ज़रा, मुड़ के देखो..हे गाणं म्हणण्यासाठी हट्ट धरला होता. याचं मराठी व्हर्जन खास सिनेमात आहे आणि आणखी एक सिक्रेट म्हणजे हे गाणं मी, सारंग आणि मायराने मिळून आम्ही स्वत: गायलं आहे.” असं मुक्ता या व्हिडीओमध्ये सांगत आहे.
हेही वाचा : हृदयविकाराचा झटका कशामुळे आला? श्रेयस तळपदे म्हणाला, “करोनाची लस घेतल्यावर…”
नेटकऱ्यांनी मुक्ताच्या या हटके लूकवर कमेंट्स केल्या आहेत. “सत्तरीतील मुक्ता… सुंदर”, “खूप सुंदर गाणं आहे”, “आम्ही तुला ओळखलंच नाही… गाणं खूप सुंदर झालंय” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडीओवर आल्या आहेत. दरम्यान, ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट सध्या चांगलं यश मिळवत असल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसांत सिनेमाने ५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.