‘वाळवी’नंतर आता परेश मोकाशी दिग्दर्शित नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून यामध्ये नम्रता अन् मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
“प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते” या संवादाने टीझरची सुरुवात होते. कामावर जाणाऱ्या महिलांना घरातील कामांना हातभार लावण्यासाठी एका काम करणाऱ्या बाईची गरज भासते आणि अशातच घरकाम करणाऱ्या महिलेने एक दिवस दांडी मारली तरी, कशी तारांबळ उडते याची झलक आपल्याला ‘नाच गं घुमा’च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, बालकलाकार मायरा वायकुळ यांनी भूमिका साकारल्या आहेत. टीझरमध्ये मायराचा गोड अंदाज सर्वाचं लक्ष वेधून घेतो.
हेही वाचा : “स्वत:ला ग्रेट म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे…”, प्रथमेश लघाटेचं नेटकऱ्याला उत्तर; म्हणाला, “माझी भाषा…”
चित्रपटात आघाडीचे कलाकार व रंजक कथानक असल्याने काहीतरी आगळंवेगळं पाहायला मिळणार हे निश्चित होतं. ‘नाच गं घुमा’चं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं असून लेखक म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळली आहे. जर एखादी स्त्री तिच्या घरची ‘राणी’ असेल, तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी ‘परीराणी’च्या रुपात समोर येते असं या चित्रपटाचं आगळंवेगळं कथानक आहे.
मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा धमाल चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटी-मोठी भांडणं यावर हा चित्रपट बेतला आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि व चि सौ कां’, ‘आत्मपॅम्प्लेट’ आणि ‘वाळवी’नंतर आता परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहेत.