१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. एक चित्रपट सुधीर फडके यांचा बायोपिक ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा आहे. तर दुसरा चित्रपट ‘नाच गं घुमा’ आहे. दोन्ही चित्रपटांची खूप दिवसांपासून चर्चा होती आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर बुधवारी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले.
उत्तम कलाकारांची मांदियाळी असलेले दोन्ही मराठी सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले. तर या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळता आली असती का, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. अशातच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निर्मात्यांना याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी दोन्ही सिनेमांच्या क्लॅशबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
स्वरगंधर्व सुधीर फडके वरच्या दर्जाचा चित्रपट – सौरभ गाडगीळ
सौरभ गाडगीळ म्हणाले, “स्वप्नील जोशी माझा चांगला मित्र आहे, तो त्या चित्रपटाचा निर्माता आहे. दोन्ही चित्रपटांचे जॉनर खूप वेगळे आहेत. आमचा सिनेमा खूप मोठा आहे, बायोपिक आहे. हा चित्रपट पाहणारे लोक वेगळे आहेत. ‘नाच गं घुमा’चा प्रेक्षक वेगळा आहे. मला वाटत नाही दोन्ही चित्रपटांची स्पर्धा होईल. थिएटर मिळण्यात कमी जास्त होऊ शकतं, पण आम्ही ते आपापसांत समंजसपणे सोडवला आहे, त्यामुळे थिएटर दोन्ही चित्रपटांना मिळतील. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट खूप वरच्या दर्जाचा आहे. मी चित्रपट पाहिलाय किंवा मी निर्माता आहे म्हणून नाही तर कलाकारांचा अभिनय व स्क्रीनप्ले खूप चांगला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की कुठला हिंदी सिनेमा आला तरी तो याच्याशी स्पर्धा करू शकेल, अशी मला खात्री आहे. आमचा सर्वांचा हेतू चांगला सिनेमा करायचा होता आणि तो आम्ही केलाय, त्यामुळे याला यश नक्कीच मिळेल. आम्ही खरा सिनेमा केलाय त्यामुळे ‘नाच गं घुमा’ किंवा कोणताही सिनेमा आला तरी स्पर्धेसाठी स्वागत आहे पण आम्ही व आमची टीम कॉन्फिडंट आहोत.”
आम्हाला मुहूर्त साधायचा होता – योगेश देशपांडे
दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणाले, “त्यांचा सिनेमा उत्तम असेल, उत्तम असावा यासाठी त्यांच्या टीमला शुभेच्छा. दोन्ही मराठी सिनेमे, दोन्ही मराठी व्यावसायिक, दोन्हीत मराठी कलाकार आहेत. सगळीकडे सगळे लोक आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो, तेही आमच्याबरोबर काम करतात, त्यामुळे स्पर्धा हा विषयच नाही. स्वरगंधर्व सुधीर फडके हे नाव जेव्हा आपण ऐकतो, महाराष्ट्रात किंवा परदेशात त्यांचं नाव जेव्हा कानावर पडतं तेव्हा आपसूक वाटतं की हे महाराष्ट्र दिनीच पाहिजे. महाराष्ट्राचं इतकं मोठं व्यक्तिमत्त्व आहे, त्यांची बायोपिक, जीवनप्रवास महाराष्ट्र दिनाव्यतिरिक्त दुसरं कधी करू शकतो. त्यामुळे हा मुहूर्त आम्हाला साधायचा होता, म्हणून हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित केला. ‘नाच गं घुमा’ हा स्पर्धेचा विषय नाही. त्यांच्या टीमला आमच्या शुभेच्छा की त्यांचा चित्रपट चांगला असावा व प्रेक्षकांना आवडावा.”
स्पर्धा नाही, दोन्ही सिनेमे चांगले चालावे, मराठी सिनेमे चांगले चालावे, एवढीच इच्छा असल्याचं सौरभ गाडगीळ ‘तारांगण’शी बोलताना म्हणाले.