मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या काळजाच्या जवळचा विषय आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी ‘सैराट’ (Sairat) प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर चित्रपटाला आठ वर्षं पूर्ण झाली असली तरीही या चित्रपटाची झिंग अजूनही कायम आहे. चित्रपटातील गाणी, संवाद, तसेच भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) ‘सैराट’चं (Sairat) दिग्दर्शन केलं होतं; तर रिंकू राजगुरू आकाश ठोसर व (Rinku Rajguru and Akash Thosar) या नवोदित कलाकारांनी ‘सैराट’ (Sairat) मधून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. या चित्रपटातील परश्या व आर्ची या जोडीनं तर अवघ्या जगाला ‘याड’ लावलं होतं. अशातच आता हे दोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘याड’ लावणार आहेत. कारण – ‘सैराट’ (Sairat) पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे.

जुन्या चित्रपटांच्या पुन:प्रदर्शनाचा ट्रेंड

काही दिवसांपासून जुन्या चित्रपटांच्या पुन:प्रदर्शनाचा प्रकार चांगलाच रुळला आहे. प्रेक्षकांकडून त्यांच्या आवडत्या जुन्या चित्रपटांना पुन्हा अनुभवण्याची मागणी लक्षात घेता, चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत ‘सनम तेरी कसम’, ‘रॉकस्टार’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘लैला मजनू’, ‘करण अर्जुन’, ‘ये जवानी है दिवानी’सारखे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रेक्षकांकडूनही या चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटांच्या यादीत एका मराठी चित्रपटाची भर पडणार आहे आणि तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’ (Sairat).

‘सैराट’ पुन्हा कधी प्रदर्शित होणार?

‘झी स्टुडिओज’कडून नुकतीच ‘सैराट’च्या (Sairat) पुन:प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. झी स्टुडिओजनं एक खास व्हिडीओ शेअर करीत चित्रपटाच्या पुन:प्रदर्शनाची घोषणा केली आहे. “नऊ वर्षांनी पुन्हा एकदा सुटणार पिरतीचं वारं, ‘सैराट’ची (Sairat) जादू पुन्हा अनुभवा, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात २१ मार्चपासून” असं म्हणत चित्रपटाच्या पुन:प्रदर्शनाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अनेकांनी अनेक कमेंट्सद्वारे याबद्दलचा आनंदही व्यक्त केला आहे.

‘सैराट’ने अनेक समीकरणं बदलली

‘सैराट’ (Sairat) पाहण्यासाठी प्रेक्षक पहाटे ४ वाजल्यापासून तिकीट रांगेत उभे राहत. चित्रपटगृहात एखाद्या जत्रेपेक्षा जास्त दंगा पाहायला मिळाला. गावाकडची मंडळी तर ट्रॅक्टरवर बसून चित्रपट पाहायला जाताना दिसून आली. ‘सैराट’नं अनेक समीकरणं बदलली. त्याशिवाय रंग, जात, राजकारण, भाषा, संगीत, ग्रामीण व्यवस्था व स्त्रीवाद यांबद्दलची चर्चाही घडवून आणली होती. एकूणच ‘सैराट’नं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं आणि हेच वेड आता पुन्हा लागणार आहे.

‘सैराट’ची १०० कोटींची कमाई

दरम्यान, नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिग्दर्शित केलेल्या, आर्ची-परश्या यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आणि अजय-अतुल (Ajay-Atul) यांचं संगीत असलेल्या ‘सैराट’नं (Sairat) बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. हाच चित्रपट आता पुन:प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पुन्हा एकदा तितकाच गल्ला जमवणार का? आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा तितकंच याड लावू शकणार का? याकडे समस्त सिनेप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.

Story img Loader