‘नाळ २’ या चित्रपटामुळे सध्या नागराज मंजुळे चर्चेत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही झळकले. लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच नागराज सध्या अभिनयातही वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. कायम हटके, वेगळे आणि डोक्याला खाद्य देणारे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक नागराज आहेत. आपल्या चित्रपटातून ते समाजाबद्दल, विषमतेबद्दल भाष्य करत असतात.
नुकतंच नागराज यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन अ न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात नागराज यांनी त्यांच्या चित्रपटांबद्दल तसेच एकूणच समाजातील विषमतेवरही भाष्य केलं. याबरोबरच आपल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव यावरही भाष्य केलं. डॉ. आंबेडकर हे नेमके भारताचे नायक होते का दलित समाजाचे की महार समाजाचे नायक होते, याबद्दल निर्माण झालेला संभ्रम याबद्दल नागराज यांना प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : मटका किंग रतन खत्रीच्या जीवनावर बेतलेला असणार नागराज मंजुळे यांचा पुढील चित्रपट; दिग्दर्शक म्हणाले…
त्यावेळी उत्तर देताना नागराज यांनी आपल्या वडिलांच्या बाबतीतील एक प्रसंगाची आठवण सांगितली. वाचन सुरू केल्यानंतर नागराज यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता, अन् त्यावेळी दहावी पास झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो लावला होता अन् त्यावेळी तो फोटो पाहून नागराज आणि त्यांचे वडील यांच्यात तणाव निर्माण झाला होता. नागराज यांच्या वडिलांना आपल्या मुलाची ही कृती आवडली नव्हती.
याविषयी बोलताना नागराज म्हणाले, “माणूस म्हणून आपण फार वेगवेगळ्या जातीत, धर्मात विभागले गेलो आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर परदेशात आपल्याला एखादा भारतीय दिसला किंवा इतर राज्यात आपल्याला आपल्या राज्यातील कुणी व्यक्ती दिसली तर आपल्याला आनंद होतो. पण भारतात एका भारतीयाला कुणीच किंमत देत नाही. हीच गोष्ट राज्य, जिल्हा, तालुका या स्तरावर लागू होते. आपण माणूस म्हणून फार विभागले गेलो आहोत.”
पुढे नागराज म्हणाले, “बाबासाहेबांनी कधीच असा विचार केला नाही. त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं. शिवाजी महाराज, फुले यांनी सगळ्यांसाठी काम केलं आहे. त्यामुळे या महानायकांनासुद्धा विभागलं गेलं होतं, आता ते चित्र बदलताना दिसत आहे. बाबासाहेब हे सगळ्यांचे नायक आहेत. आधी ही गोष्ट लोकांच्या पचनी पडत नव्हती. त्यामुळे मी जेव्हा घरात बाबासाहेबांचा फोटो लावला तेंव्हा माझ्या वडिलांनाही वाटलं असावं की हे आपले नायक नाहीत. त्यावेळी मी त्यांच्याशी खूप भांडलो होतो. माझ्या वडिलांनी बाबासाहेबांचा फोटो बाहेर फेकून देण्याची भाषा केली होती, त्यावेळी मी त्यांना म्हणालो की तुम्ही जर हा फोटो बाहेर फेकलात तर मी घरातील तुमचे सर्व देवांचे फोटोसुद्धा बाहेर फेकीन.”
त्यानंतर बरेच दिवस नागराज आणि त्यांचे वडील यांच्यात धुसफूस होती, नंतर हळूहळू नागराज यांनी त्यांच्या वडिलांना बासाहेबांच्या विचारांबद्दल सांगायला सुरुवात केली अन् कालांतराने तो वाद मिटला. या मुलाखतीमध्ये नागराज यांनी इतरही बऱ्याच विषयांवर भाष्य केलं आहे.