प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सध्या त्यांच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचे चित्रीकरण आणि दादा कोंडके यांच्यात एक खास कनेक्शन असल्याची गोष्ट समोर आली आहे. एका मुलाखतीत नागराज मंजुळेंनी याबद्दलचा खुलासा केला आहे.
नागराज मंजुळे यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी दादा कोंडके यांच्यांबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : Video : “नागराज मंजुळेंचे आकाशवर जास्त प्रेम”; सल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्याने व्यक्त केली नाराजी, म्हणाले “त्यांनी आम्हाला…”
“घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचे जवळपास ८० टक्के कोल्हापुरातील गगनबावडा या ठिकाणी झालं आहे. या चित्रपटाचा प्रमुख भाग जंगलात घडतो. म्हणून ती जागा अत्यंत महत्त्वाची होती. यासाठी आम्ही खोपोली, भोर, नागपूर, मध्य प्रदेश अशा ठिकाणचा शोध घेतला. आमचे जवळपास चार-पाच महिने जंगल शोधण्यातच गेले.
पण नंतर कोल्हापूरमध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आम्हाला चित्रीकरणासाठी आणि कथेला सुयोग्य अशी जागा मिळाली. यावेळी गगनबावडामधील स्थानिक लोकांनी आम्हाला खूप मदत केली. शूटींग करत असतानाच तेथील स्थानिकांनी आम्हाला सांगितलं की, दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटातील गाण्यांचे शूटींग हे या ठिकाणी झालं होतं. हे ठिकाण दादांच्या अत्यंत आवडीचं होतं. आम्हाला हे समजल्यावर आमच्यात एक वेगळीच ऊर्जा संचारली”, असे नागराज मंजुळेंनी म्हटले.
आणखी वाचा : पहिला प्रपोज ते सेलिब्रिटी क्रश, नागराज मंजुळेंनी केला खुलासा; म्हणाले “आता सांगण्यात…”
दरम्यान ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.