‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे नागराज मंजुळे गेले काही दिवस त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘घर बंदूक बिरयानी.’ सर्व प्रेक्षक त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता या चित्रपटात प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.
‘घर बंदूक बिरयानी’ या हटके नावामुळेच या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष वेधलं गेलं होतं. यात काय बघायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. त्याचप्रमाणे या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याने यांना एकत्र स्क्रीन शेअर करताना बघण्याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. हा चित्रपट मार्चच्या अखेरीस प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावरून दिली. तर त्यांच्या या निर्णयामागचं कारण अजय देवगण असल्याचं बोललं जात आहे.
आणखी वाचा : “रवीना टंडनला पद्मभूषण देणं म्हणजे…” ‘त्या’ ट्वीटमुळे प्रसिद्ध निर्माता ट्रोल
घर बंदूक बिरयानी हा चित्रपट आधी ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता. ठरलेल्या प्रदर्शनाच्या तारखेच्या एका आठवड्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच आता हा चित्रपट ३० मार्च च्या ऐवजी ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे अशी माहिती नागराज मंजुळे यांनी दिली. त्यांनी या चित्रपटाचं नवीन पोस्टर शेअर करत लिहिलं, “आशेच्या भांगेची नशा भारी ‘घर बंदूक बिरयानी’ आता ७ एप्रिल २०२३ला…जाळ धूर आन धमाका…संगटच…GBB च्या नावानं चांगभलं !”
हेही वाचा : ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा येणार दूसरा भाग, नागराज मंजुळेची मोठी घोषणा
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकळण्यामागचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र नागराज मंजुळे यांनी अजय देवगणच्या आगामी भोला या चित्रपटामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. ३० मार्च २०२३ रोजी अजयचा ‘भोला’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. यात अजयबरोबर अभिनेत्री तब्बू प्रमुख भूमिकेत आहे. आता ‘भोला’ साठी ‘घर बंदूक बिरयानी’चं प्रदर्शन लांबणीवर नेलं असल्याचं म्हटलं जात आहे.