२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. ‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल आहेत.
नाळ चित्रपटाच्या पहिल्या भागातील ‘जाऊ दे ना वं’ हे गाणं चांगलंच लोकप्रिय ठरलं होतं. आता यानंतर दुसऱ्या भागातील ‘भिंगोरी’ या गाण्यातून चैतूच्या या प्रवासाची सुरुवात बघायला मिळणार आहे. ‘नाळ २’ मध्ये मोठा झालेला चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आला आहे.
आणखी वाचा : लेदरचं जॅकेट, हातात बंदूक अन्…; विशाखा सुभेदार पुन्हा झळकणार बेधडक अंदाजात, फोटो पाहिलात का?
‘भिंगोरी’ या गाण्यातून पश्चिम महाराष्ट्रात डोंगररांगांनी वेढलेल्या गावाचं निसर्ग सौंदर्य आणि या गावात आलेल्या चैतूला बघून आनंदी झालेले गावकरी पाहायला मिळत आहेत. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला बघतो, पण इथून पुढे त्याचा हा प्रवास नेमका कुठवर जातो, ती कहाणी या चित्रपटात बघायला मिळणार आहे.
आणखी वाचा : Video : “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही” प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर वैतागला दिग्दर्शक, कारण…
‘भिंगोरी’ हे गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभलं आहे. या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.