नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नागराज मंजुळे या चित्रपटात दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमधून त्याची झलक पाहायला मिळत आहे. घर बंदूक बिरयानी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने लोकसत्ता डिजिटल अड्डाला हजेरी लावली.
‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारे नागराज मंजुळे खऱ्या आयुष्यात पोलिसांत भरती झाले होते. परंतु, अवघ्या १२-१३ दिवसांत त्यांनी ही नोकरी सोडली. याचा किस्सा नागराज मंजुळेंनी लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये सांगितला.
नागराज मंजुळे म्हणाले, “१९९५ साली दहावी पास झाल्यानंतर मी पोलिसांत भरती झालो होतो. दहावीत मी दोनदा नापास झालो होतो. माझ्या मित्राला पोलिसांत जायचं होतं. त्याला खूप वेड होतं. माझं असं काहीच ठरलं नव्हतं. मी सकाळी व्यायाम करायचो, पळायला जायचो. मित्रांबरोबर बास्केटबॉल, हँडबॉल असे खेळ खेळायचो. माझ्या मित्राबरोबर पोलीस भरती कशी असते, हे बघण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. प्रत्यक्षात बघितल्यावर कळलं की हे खूप कठीण आहे. बरं त्यावेळी पोलीस भरती किंवा शिक्षक एवढंच माहीत होतं. डॉक्टर, इंजिनिअर आपण होऊ शकत नाही, हे मला कळून चुकलं होतं. व्यवसायाबद्दलही फारसं ज्ञान नव्हतं.”
“माझा मित्रच माझ्याकडून जनरल नॉलेज पाठ करुन घ्यायचा. मी हे सगळं अजिबात गांभीर्याने घेतलं नव्हतं. भरती झाल्यावर मला कळलं की आता आपल्याकडे जबाबदारी आली आहे. मी १२-१३ दिवसंच पोलिसाची नोकरी केली. त्या १३ दिवसांतही मी दोन वेळा रंगीला बघितला होता. तेव्हापासूनच मल चित्रपटांचं वेड होतं. मी लहानपणी खेळातही सिनेमागृहाचा मालक व्हायचो. मी चित्रपटांचे पोस्टर काढायचो. ते करता करता मी पोलीसांत भरती झालो. आणि आता मी चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याती भूमिका साकारत आहे,” असंही पुढे ते म्हणाले.
आणखी वाचा – “एक्स गर्लफ्रेंड बघून जळत असेल” आकाश ठोसरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला “मला…”
‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर हेमंत अवताडे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.