यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. पहिला ऑस्कर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्ट फिल्मला मिळाला. तर, दुसरा पुरस्कार ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला. ऑस्कर विजेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यंदाचं ऑस्कर कनेक्शन सांगितलं आहे.
नागराज मंजुळे यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी ऑस्कर विजेत्यांचं त्यांच्या चित्रपटांबरोबर असलेलं कनेक्शन सांगितलं आहे. “या वर्षीचा ऑस्कर विजेता भारतीय माहितीपट elephant whisper माझी मैत्रीण संचारीनं एडिट केला आहे. ‘नाळ’ ही संचारीनंच एडिट केली आहे. सुधाकर आणि संचारी खूप खूप प्रेम आणि सदिच्छा.
विशेष म्हणजे ‘नाटू नाटू’ गाण्याचे गीतकार चंद्रबोस यांनीच GBB मधल्या ‘गुन गुन’ गाण्याचे तेलगू बोल लिहिले आहेत..
यावेळच ऑस्कर कनेक्शन असं आहे.
चांगभलं!” असं नागराज यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. तर, ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. दोन्ही विजेत्यांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच नागराज मंजुळे यांनी सांगितलेलं यंदाचं ऑस्कर कनेक्शनही चर्चेत आहे.