दिग्दर्शक नागराज मंजुळे आज मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. तीन वर्षांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन येणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुख करणार असल्याचंही निश्चित झालं होतं. आधी हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित होणार होता. परंतु तीन वर्षे उलटूनही त्याबाबत नंतर कुठलीही माहिती समोर आलेली नाही. आता यावर नागराज मंजुळे यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.

नागराज मंजुळे सध्या त्यांच्या आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्या निमित्ताने ते सध्या अनेक मुलाखती देत आहेत. आता ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ते तयार करत असलेल्या चित्रपटाबद्दल सांगितलं.

आणखी वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

ते म्हणाले, “मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट तयार करत आहे तो चांगलाच व्हावा अशी माझी इच्छा आहे. हा चित्रपट म्हणजे माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा चित्रपट केल्यानंतर आपण काहीतरी खूप छान केलंय अशी भावना माझ्या मनात कायम असणार आहे. त्यामुळे मला हा चित्रपट घाईत करायचा नाही. काहीतरी सिनेमा करायचा आणि नंतर तो मी केला असं म्हणायचा या विचारांचा मी नाही आणि मला तसं करायचं नाही.”

हेही वाचा : “माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा…” सायली संजीवने मांडलं स्पष्ट मत

पुढे ते म्हणाले, “मला माझं शंभर टक्के देऊन हा चित्रपट करायचा आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने मी त्यावर काम करतोय. आत्ता होईल किंवा नंतर होईल…पण हा चित्रपट मी आयुष्यात कधीतरी करणारच आहे. फक्त मी तो घाई गडबडीत करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा चित्रपट आहे आणि त्यामुळे तो जबाबदारीनेच केला पाहिजे.” त्यामुळे आता त्यांचा हा चित्रपट ते कधी घेऊन येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader